ताल, साधना आणि परंपरेचा सुरेल प्रवास
भारतीय शास्त्रीय संगीतात तालवाद्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या तालपरंपरेतील एक अत्यंत प्राचीन, गंभीर आणि आध्यात्मिक वाद्य म्हणजे पखवाज. पखवाजाच्या प्रत्येक बोलात, प्रत्येक ठेक्यात शिस्त, साधना आणि परंपरेचा सुगंध दरवळतो. अशाच या परंपरेतून, घरातील संगीतमय वातावरणात घडलेला आणि अल्पवयातच आपली वेगळी ओळख निर्माण करणारा युवा पखवाजवादक म्हणजे आदित्य विलास साटम…!

संगीत माझ्यासाठी केवळ कला नाही, ती माझी जीवनशैली आहे. आदित्य साटम यांच्याशी संवाद साधताना पहिल्याच वाक्यात त्यांच्या बोलण्यातून संगीताविषयीची ओढ जाणवते.
ते सांगतात, मी वयाच्या पाचव्या वर्षापासून पखवाज वादन करत आहे. लहानपणापासूनच वादनाची आवड होती. घरात नेहमी भजन, ताल, सूर यांचा साज असायचा. त्यामुळे पखवाज माझ्या आयुष्यात आपोआपच आला.
आदित्य यांचे बालपण म्हणजे संगीतमय संस्कारांची जणू एक गुरुकुलच. घरातील वातावरण, भजनाची परंपरा, वडिलांची शिकवण आणि काकांचे मार्गदर्शन यामुळे तालाशी त्यांची नाळ अगदी लहान वयातच जोडली गेली.
वडिलांकडून पहिला ठेका, काकांकडून काटेकोर धडे
आदित्य यांच्या संगीतप्रवासाची सुरुवात त्यांच्या वडिलांकडून – विलास साटम यांच्याकडून झाली. ते आठवणीने सांगतात,
सुरुवातीचे धडे मी माझ्या वडिलांकडून घेतले. तालाची शिस्त, वादनातली स्वच्छता, भजनासाठी लागणारा भाव – हे सगळं त्यांनीच रुजवलं. घरातच भजनाचा साज असल्यामुळे काका कै. प्रदीप सखाराम साटम यांचेही मार्गदर्शन लाभले. काकांनी पखवाज वादनातील काटी धडे, लयकारी, ठेका यावर विशेष भर दिला. यामुळे आदित्य यांचे वादन केवळ तांत्रिक न राहता भावपूर्ण झाले.

गुरुकृपेमुळे शास्त्रोक्त वादनाची घडण
घरगुती शिक्षणानंतर आदित्य यांच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा आला. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी शास्त्रोक्त पखवाज वादनाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. ते म्हणतात, गुरुवर्य पखवाज विशारद डॉ. श्री. दादा परब सर यांच्याकडे शिकण्याची संधी मिळणं हे माझं मोठं भाग्य आहे. डॉ. दादा परब यांच्याकडे प्रशिक्षण घेताना केवळ वादन नव्हे, तर पखवाजाची परंपरा, त्यामागील तत्वज्ञान, विविध घराणी, प्राचीन बंदिशी यांचे सखोल ज्ञान आदित्य यांना मिळाले. गुरू-शिष्य परंपरेतून घडलेली ही साधना त्यांच्या वादनात आजही ठळकपणे जाणवते.
शालेय जीवनातच स्पर्धांमधून यशाची चाहूल
संगीताची साधना आणि शिक्षण यांचा उत्तम समतोल साधत आदित्य यांनी शालेय जीवनातच अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
ते सांगतात, स्पर्धा जिंकण्यापेक्षा स्टेजवर आत्मविश्वासाने वादन सादर करता येणं, ही खरी कमाई होती. भजन स्पर्धांमध्येही त्यांना उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून गौरवण्यात आले. त्यांच्या कलेची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली असून ईळर झरलळषळल ठशलेीवी तर्फे त्यांना पखवाज वादनाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
दिग्गज कलाकारांची साथ
- आयुष्यभराची शिदोरी
आदित्य साटम यांच्या संगीतप्रवासातील सर्वात गौरवशाली क्षण म्हणजे अनेक दिग्गज कलाकारांना पखवाज साथसंगत करण्याचे मिळालेले भाग्य. ते अभिमानाने सांगतात, वयाच्या 16 व्या वर्षी भजन क्षेत्रातील नामवंत रत्न, भजन सम्राट कै. काशिराम परब बुवा यांना डबलबारीत साथ करण्याची संधी मिळाली. तो क्षण आजही अंगावर रोमांच उभे करतो. या शिवाय जगविख्यात गायक पद्मश्री सुरेश वाडकर सर यांना साथसंगत करण्याचा मानही त्यांना लाभला. तसेच कोकण भजन महर्षी भजनरत्न भालचंद्र बुवा केळूसकर, कोकण कलाभूषण श्री. भगवान लोकरे बुवा, भजन महर्षी श्री. गोपिनाथ बागवे बुवा यांसारख्या नामवंत कलाकारांसोबत त्यांनी पखवाज साथ केली.
भजनापलीकडेही विस्तीर्ण संगीतविश्व
आदित्य यांचे वादन केवळ भजनापुरते मर्यादित नाही. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, लोकगीते अशा विविध संगीतप्रकारांत त्यांनी पखवाजाची साथ केली आहे. ते सांगतात, प्रत्येक संगीतप्रकाराची लय वेगळी असते. त्या लयीशी जुळवून घेणं हीच खरी कसोटी असते. आजपर्यंत अनेक नामांकित भजनी कलाकारांच्या अल्बममध्ये त्यांनी पखवाज साथसंगत केली आहे.
महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही त्यांचे कार्यक्रम झाले असून, पखवाज वादनातून त्यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जपली आहे.- पखवाज म्हणजे साधना, संयम आणि भक्ती
आदित्य साटम यांच्यासाठी पखवाज म्हणजे केवळ वाद्य नाही, तर एक साधना आहे. पखवाज वाजवताना मन शांत असायला हवं. ताल चुकला तर सगळं कोलमडतं. त्यामुळे संयम, शिस्त आणि भक्ती या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
नव्या पिढीला ते एकच संदेश देतात – संगीतात नाव मिळवायचं असेल, तर फक्त कौशल्य पुरेसं नाही; सातत्यपूर्ण सराव आणि गुरूंचा आदर आवश्यक आहे. भविष्याचा सूर : परंपरा जपत नवे प्रयोग, भविष्यात पखवाज वादनातून अधिक संशोधन, कार्यशाळा, आणि विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. परंपरा जपत आधुनिक पिढीपर्यंत पखवाज पोहोचवणे, हेच त्यांचे स्वप्न आहे.
आदित्य विलास साटम यांचा संगीतप्रवास म्हणजे घरातील संस्कार, गुरूंची कृपा, अथक साधना आणि नम्रता यांचा सुरेल संगम आहे. आजच्या धावपळीच्या युगात पखवाजासारख्या गंभीर वाद्याला वाहून घेतलेला हा युवा कलाकार निश्चितच
तालपरंपरेचा दीपस्तंभ ठरेल, यात शंका नाही. - शब्दांकन –
सुस्मित तावडे, पालघर (7720908452)
