शिक्षण, समाजकारण आणि विचारांचा त्रिवेणी संगम
पालघर : राजतंत्र वृत्तसेवा शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व सुधीर दांडेकर यांची सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाल्याने पालघरमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रामकृष्ण गोविंद दांडेकर ऊर्फ सुधीर दांडेकर हे केवळ एक सामाजिक कार्यकर्ते नाहीत, तर ते शिक्षणतज्ञ, लेखक आणि विचारवंत म्हणूनही परिचित आहेत. पालघरच्या रोटरी क्लबच्या अध्यक्षपदाचीही धुरा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळत समाजकारणातही मोलाचे योगदान दिले आहे.
संस्थेप्रती असलेल्या निष्ठेचे उदाहरण म्हणजे, त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ शिक्षण मंडळीला दिलेली भरीव देणगी. तसेच वारकरी संप्रदायातील आदरणीय व्यक्तिमत्त्व स्व. सोनोपंत दांडेकर यांच्या भव्य पुतळ्याची उभारणीही त्यांची दूरदृष्टी आणि कार्यतत्परतेचे प्रतीक ठरली आहे. महाराष्ट्रभर फिरून निधी उभारून त्यांनी हा उपक्रम साकार केला.
या शिवाय, विधी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी उभारण्यात तसेच विविध शैक्षणिक प्रकल्प राबविण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. ‘आप्पासाहेब दांडेकर स्मृती व्याख्यानमाला’ या उपक्रमातून त्यांनी पालघरमध्ये वैचारिक संवादाचे व्यासपीठ उभे केले. ‘अक्षरवेध’ आणि ‘पुस्तकमित्र मंडळ’ यांसारख्या उपक्रमांमुळे त्यांनी साहित्य चळवळीला चालना दिली.
विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे आणि शिक्षणात नवे प्रयोग घडवून आणणे ही त्यांची खास ओळख आहे.दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष सीए सचिन कोरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “संस्थेच्या प्रगतीसाठी सातत्याने झटणारे आणि शैक्षणिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेणारे सुधीरभाऊ उपाध्यक्षपदी विराजमान होणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.” सुधीर दांडेकर यांच्या या निवडीमुळे सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
