जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सुधारित आदेश केले जारी
पालघर, दि २ एप्रिल : जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर आता नियंत्रण आले असून इंधन पुरवठा पूर्ववत सुरळीत सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने सुधारित आदेशात स्पष्ट केले आहे. तरीही सार्वजनिक सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पेट्रोलच्या खुल्या विक्रीवरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या सुधारित आदेशानुसार, पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल केवळ वाहनांच्या टाकीतच भरावे, कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात पेट्रोल विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यामागील उद्देश म्हणजे संभाव्य साठेबाजी, गैरवापर आणि अनुचित घटनांना आळा घालणे हा आहे.
दरम्यान, डिझेल पुरवठा पूर्णपणे सुरळीत असल्याने त्याच्या वितरणावर कोणतीही नवीन बंधने लादण्यात आलेली नाहीत. मात्र, डिझेलची असामान्य किंवा जादा उचल होत नाही याची खात्री करण्याचे निर्देश पंपचालकांना देण्यात आले आहेत. तसेच वाहनाव्यतिरिक्त होणाऱ्या डिझेल वितरणाची स्वतंत्र नोंद ठेवणे पंपचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे.
सदर आदेश तात्काळ प्रभावाने लागू राहणार असून पुढील आदेश होईपर्यंत प्रभावी राहणार आहे.
जिल्हा प्रशासनाने सर्व पेट्रोल पंपांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे तसेच विक्री नोंदी नियमित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पेट्रोल, डिझेलची अनधिकृत साठेबाजी करणाऱ्या विरूद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५, कायद्यानुसार कडक कारवाई करावी.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्थेविरुद्ध पेट्रोलियम नियम २००२ मधील नियम ११८ ते २०२ व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत दंडात्मक व फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
