तारापूर एमआयडीसी येथे क्लोरीन आपत्तीवरील भव्य ऑफ-साईट मॉक ड्रिल यशस्वी

पालघर : औद्योगिक सुरक्षा व सार्वजनिक आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने, पालघर जिल्हा प्रशासनाने आज तारापूर एमआयडीसी येथे क्लोरीन गॅस गळतीच्या संभाव्य आपत्तीवर आधारित भव्य ऑफ-साईट मॉक ड्रिल यशस्वीरीत्या आयोजित केली. ही कवायत रासायनिक अपघात (आपत्कालीन नियोजन, तयारी व प्रतिसाद) नियम, १९९६ अंतर्गत घेण्यात आली.

या मॉक ड्रिलमध्ये सुपरफॉर्म केमिस्ट्रीज या औद्योगिक युनिटमध्ये नीडल व्हॉल्व्ह निकामी होऊन क्लोरीन गॅसची मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याचे काल्पनिक चित्र उभे करण्यात आले. या घटनेत एक ऑन-साईट कर्मचारी व परिसरातील तीन नागरिक प्रभावित झाल्याचे गृहित धरून तात्काळ आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली कार्यान्वित करण्यात आली.जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखर (IAS) यांनी मुख्य घटना नियंत्रक म्हणून संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व केले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री विवेकानंद कदम यांनी विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधला. प्रत्यक्ष क्षेत्रातील समन्वयक संदीप पाटील व अनुज पराटे यांनी केला. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयचे संयुक्त संचालक माधव तोटेवाड (पालघर) व नरेश देवराज (वसई) यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक अमोल बैत, हिम्मतराव शिंदे व श्रीनिवास सब्बन यांनी कार्यवाहीचे निरीक्षण केले.

या मॉक ड्रिलमध्ये पोलीस, अग्निशमन दल, NDRF, सिव्हिल डिफेन्स, आरोग्य विभाग, MPCB, परिवहन विभाग तसेच विविध औद्योगिक आस्थापनांनी सक्रिय सहभाग नोंदविला. पोलीस विभागाने अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक नरळे व उपअधीक्षक विकास नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रभावित क्षेत्रात बंदोबस्त ठेवून वाहतूक नियंत्रण केले व आपत्कालीन वाहनांसाठी ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करून दिला. परिवहन अधिकारी अविनाश काकड यांनी वाहतूक व्यवस्थापनात सहकार्य केले.

रेड झोनमधील नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करून त्यांना मदत शिबिरात हलविण्याचे काम पंकज एम. गौतम यांच्या नेतृत्वाखाली अजय राजपूत यांच्या सहकार्याने पार पडले. सिव्हिल डिफेन्सचे काशिनाथ कुर्कुटे व MSRTC चे एजाज शेख यांनी यामध्ये समन्वय साधला.

अग्निशमन व बचाव कार्य अग्निशमन अधिकारी वैभव तांदेल व एन डी आर एफ कमांडर पूनिया यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. औद्योगिक अग्निशमन पथकातील रमेश हलवाई व मुकेश कदम यांनी विषारी वायू नियंत्रित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या.

MPCB चे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे व राजेंद्र पवार यांनी हवेतील विषारी घटकांचे निरीक्षण करून सुरक्षिततेची खात्री केली. वैद्यकीय प्रतिसाद सिव्हिल सर्जन डॉ. रामदास मराड यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आला. जखमींना तात्काळ उपचार देऊन आशिर्वाद हॉस्पिटल व ठुंगा हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. जिथे डॉ. पराग कुलकर्णी व डॉ. दिलीप बिलोलीकर यांनी त्यांना स्थिर केले. तसेच, तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (TIMA) चे अध्यक्ष डी. के. राऊत व संयोजक अरुण सावंत यांनी लॉजिस्टिक व आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून दिली. या मॉक ड्रिलच्या यशस्वी आयोजनातून पालघर जिल्हा प्रशासनाची औद्योगिक आपत्ती व्यवस्थापनातील तयारी, उत्कृष्ट समन्वय क्षमता व सार्वजनिक सुरक्षिततेप्रती असलेली कटिबद्धता अधोरेखित झाली आहे. भविष्यातील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीस प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button