‘पोषण पंधरवडा’चा जिल्हास्तरीय शुभारंभ उत्साहात

पालघर : जिल्हा परिषद पालघरच्या जननायक बिरसा मुंडा सभागृहात आज ‘पोषण पंधरवडा’चा जिल्हास्तरीय शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. कुपोषणमुक्त समाजाच्या दिशेने जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.९ ते २३ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात ‘पोषण पंधरवडा’ राबविण्यात येणार असून या उपक्रमात १२ ग्रामीण व ३ शहरी बालविकास प्रकल्पांचा सक्रिय सहभाग असणार आहे. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) इजाज अहमद शरीकमसलत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी अंगणवाडी सेविकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद करत सांगितले की, पोषणाशी संबंधित विविध उपक्रम त्या प्रभावीपणे राबवत आहेत. पोषण पंधरवड्याच्या माध्यमातून ही जनजागृती अधिक व्यापक होऊन प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर यांनी प्रास्ताविक सादर करत पोषण पंधरवड्याचे उद्दिष्ट, नियोजित उपक्रम आणि कुपोषण निर्मूलनासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमास जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO), पर्यवेक्षिका तसेच अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी अंगणवाडी सेविकांसाठी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले असून पोषणविषयक विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान अंगणवाडी सेविकांनी तयार केलेल्या विविध पौष्टिक आहार व पारंपरिक पाककृतींचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी या प्रदर्शनांची पाहणी करून सेविकांच्या कल्पकतेचे व कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ‘पोषण पंधरवडा’च्या माध्यमातून जिल्ह्यात पोषणाबाबत व्यापक जनजागृती होऊन कुपोषणाविरुद्धची लढाई अधिक सक्षम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button