कोनसई फटाका कारखान्यातील स्फोट प्रकरणी चौघांना अटक

वाडा : रुपेश मोकाशी

वाडा तालुक्यातील कोनसई गावाच्या आडबाजूला एका खासगी जागेत पत्र्याची शेड उभारून अवैधरित्या सुरू असलेल्या फटाका कारखान्यात मंगळवारी (दि.२१) दुपारी झालेल्या भीषण स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. या प्रकरणी वाडा पोलिसांनी चार जणांना मध्यरात्री अटक केली आहे.

कंपनीचा मालक नरेंद्र सिंग, त्याचा साथीदार श्रीपद यादव, सुपरवायझर योगेश मोकाशी आणि जमिन मालक वसंत नाईक यांना अटक करण्यात आली. कोनसई गावातील वसंत नाईक यांच्या मालकीच्या जागेत शेड उभारून काही महिन्यांपूर्वी सुतळी बॉम्ब बनविण्याचा कारखाना सुरू करण्यात आला होता. या कारखान्यात मृत भावेश वावर, मोनिका पडवळे यांच्यासह ३३ महिला रोजंदारीवर काम करत होत्या.

मंगळवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास कामगार भावेश वावर सुतळी बॉम्बसाठी लागणाऱ्या दारूचे मिश्रण तयार करत असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या मोनिका पडवळे यांना ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेत मोनिका जाधव, जागृती गवते, प्रतिभा पवार, अर्चना मिसाळ आणि जयश्री गरळ या जखमी झाल्या असून त्यांच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. यादव शेखरे यांनी दिली.

कोनसई येथील लोखंडी शेडमध्ये सुतळी बॉम्बसाठी लागणाऱ्या रासायनिक दारूचे मिश्रण तयार केले जात होते. मृत कामगार स्वतःच्या हाताने हे मिश्रण तयार करत होता, तर बाजूच्या जागेत महिला कामगार डब्यांमध्ये दारू भरून सुतळी गुंडाळण्याचे काम करत होत्या. तयार झालेले सुतळी बॉम्ब तालुक्यातील आब्जे आणि निचोळे येथे पॅकिंगसाठी पाठवले जात होते.

या कारखान्यासाठी कोणतीही कायदेशीर परवानगी घेण्यात आलेली नव्हती. नियम धाब्यावर बसवून सुरू केलेला हा अवैध कारखाना अखेर कामगारांच्या जीवावर बेतला आहे.

स्फोट प्रकरणी मालक, सहकारी, व्यवस्थापक आणि जमिन मालक यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत भादवि कलम १०५, १२५ (अ, ब), २८८ (३) (५) तसेच स्फोटक अधिनियम ३, ४, ५ अन्वये वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी एस. एस. मेहेर करीत आहेत.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button