पालघर, दि.२२ : पालघर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राजेंद्र पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. एमपीएससी २००२ बॅचचे अधिकारी असलेले पाटील यांना प्रशासकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे.
पाटील यांनी गटविकास अधिकारी म्हणून जळगाव व मेहकर (जि. बुलढाणा) येथे कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर बुलढाणा व नंदुरबार जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात सहाय्यक आयुक्त (तपासणी), तसेच नंदुरबार येथे प्रकल्प संचालक आणि नाशिक येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. सध्या ते राज्य निवडणूक आयोगात उपायुक्त म्हणून कार्यरत होते.
एम.ए., एम.एड. व सेट पात्रता असलेल्या पाटील यांनी पूर्वी प्राध्यापक म्हणूनही सेवा बजावली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी त्यांचे स्वागत केले. यापूर्वीचे अधिकारी रवींद्र शिंदे सेवानिवृत्त झाल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली.
राजेंद्र पाटील यांची पालघर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती
