नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ (सीएसएमयू), पनवेल येथे आयोजित “सीएसएमयू महा जॉब फेअर 2.0 – 2026” या दोन दिवसीय उपक्रमाचा पहिला दिवस आज मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला. 29 आणि 30 एप्रिल दरम्यान आयोजित या जॉब फेअरमध्ये युवक-विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रोजगाराच्या संधींचा लाभ घेतला.

विद्यापीठ परिसरात भरविण्यात आलेल्या या मेगा जॉब फेअरमध्ये राज्यासह देशभरातील विविध नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. आयटी, फार्मा, मॅनेजमेंट, एज्युकेशन आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील 100 हून अधिक कंपन्यांनी आपली उपस्थिती दर्शवली असून सुमारे 2100 पेक्षा अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना थेट स्थळी मुलाखती देण्याची संधी मिळाल्यामुळे वातावरण उत्साहपूर्ण दिसून आले.

या प्रसंगी कुलगुरू डॉ. केशरी लाल वर्मा यांनी उपस्थित कंपनी प्रतिनिधींना संबोधित करताना, नव्या पिढीतील प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे नमूद केले. “प्रत्येक व्यक्ती सुरुवातीला नवीन असते, मात्र योग्य संधी मिळाल्यास ती आपली क्षमता सिद्ध करू शकते,” असे ते म्हणाले.

कुलसचिव डॉ. आर. पी. शर्मा यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत, युवकांना उद्योग क्षेत्राशी थेट जोडण्याचा हा प्रभावी प्रयत्न असल्याचे सांगितले. त्यांनी सहभागी सर्व कंपन्या आणि मान्यवरांचे स्वागत करून उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे आभार मानले.

पहिल्याच दिवशी हजारो उमेदवारांनी नोंदणी करून मुलाखती दिल्याने जॉब फेअरला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या उपक्रमामुळे युवकांना करिअरच्या नव्या दिशा मिळत असून उद्योग आणि शिक्षण यांच्यातील दुवा अधिक मजबूत होत आहे. पहिल्या दिवसाच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात उमेदवार उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
