स्वातंत्र्यसैनिक रेवजीभाई चौधरी जयंती उत्साहात;

‘दहावी-बारावीनंतर पुढे काय?’ विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मोखाडा : सौरभ कामडी

जव्हार तालुक्यातील सारसून परिसरातील जांभ्याचा पाडा येथे स्वातंत्र्यसैनिक रेवजीभाई चौधरी यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम उत्साहात पार पडले. स्वातंत्र्यसैनिक रेवजीभाई चौधरी सामाजिक प्रतिष्ठान, खरवंद (ता. जव्हार, जि. पालघर) यांच्या वतीने रविवारी (दि. २६ एप्रिल) निबंध स्पर्धा, बक्षीस वितरण, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच ‘दहावी-बारावीनंतर पुढे काय?’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात रेवजीभाई चौधरी तसेच क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून करण्यात आली. १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात धैर्याने सहभाग घेत “ढाण्यावाघ” अशी ओळख मिळवलेल्या रेवजीभाई चौधरी यांच्या कार्याचा यावेळी गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी यांचा प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच जि.प. शाळा जांभ्याचा पाडा येथील विद्यार्थी, दहावी-बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. यावेळी दोन अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याची घोषणाही करण्यात आली.

प्रतिष्ठानकडून वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असून त्यामध्ये करिअर मार्गदर्शन शिबिरे, महिला सक्षमीकरण, आरोग्य शिबिरे, बालसंस्कार वर्ग आणि शैक्षणिक साहित्य वाटप यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विष्णू चौधरी, सचिव नारायण शेंडे, मनश्री चौधरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद अवतार, घाटाळ सर, जि. प. शाळेचे शिक्षकवृंद, मनोज कामडी, पत्रकार प्रमोद मौळे तसेच ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन काशिनाथ शेंडे यांनी केले. मनोज कामडी, प्रमोद मौळे व मनश्री चौधरी यांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button