पालघर नगर परिषद : उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदासाठी सत्ताधारी शिवसेनेत तीव्र राजकीय संघर्ष, निर्णयाची सूत्रे एकनाथ शिंदेंकडे

पालघर : मंगेश तावडे

पालघर नगर परिषद निवडणुकीत उत्तम मोरेश्वर घरत यांच्या नगराध्यक्षपदासह तब्बल १९ नगरसेवक निवडून आणत शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. संख्याबळाच्या जोरावर सत्ता हातात असली तरी आता खरे राजकारण उपनगराध्यक्षपद आणि 2+1 स्वीकृत नगरसेवक पदांभोवती फिरू लागले आहे. या पदांवर कोणाची वर्णी लागते, याकडे केवळ राजकीय वर्तुळच नव्हे तर सर्वसामान्य पालघरवासीयही डोळे लावून बसले आहेत.

यावेळी शिवसेनेकडून अनेक मातब्बर उमेदवार निवडून आल्याने उपनगराध्यक्षपदासाठी तीव्र चुरस निर्माण झाली आहे. सलग दुसऱ्यांदा निवडून येत शिवसेनेच्या उपनेत्याचा पराभव करणारे चंद्रशेखर ऊर्फ बंड्या वडे, मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलेले अमोल पाटील, राजेंद्र पाटील तसेच अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी रईस खान यांची नावे उपनगराध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत. मात्र, यापैकी एकालाच संधी मिळणार असल्याने अंतर्गत नाराजी, लॉबिंग आणि दबाव राजकारण वेग घेत असल्याचे चित्र आहे.

उपनगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या डॉ. उज्ज्वला काळे यांना गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांचा उपनगराध्यक्षपदाचा दावा सध्या बाजूला पडल्याचे मानले जात आहे. तथापि, गटनेतेपद हेही सत्तेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या नियुक्तीमागे पक्षाची दीर्घकालीन रणनीती असल्याची चर्चा राजकीय जाणकारांत सुरू आहे. १९ नगरसेवकांचे संख्याबळ शिवसेनेकडे असल्याने इच्छुकांची संख्या वाढली असून, त्यामुळे नेतृत्वासाठीची स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.

पूर्वीपासून नगराध्यक्ष – उपनगराध्यक्ष पदाच्या चर्चेत असलेले सुभाष पाटील आणि रवींद्र ऊर्फ बंड्या म्हात्रे हे दोघे निवडणुकीत पराभूत झाल्याने थेट शर्यतीतून बाहेर पडले आहेत. मात्र, १२ तारखेला जाहीर होणाऱ्या स्वीकृत नगरसेवकांच्या यादीत या दोघांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचे समजते. स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांची नावे आघाडीवर असली तरी, चर्चेत नसलेल्या एखाद्या तिसऱ्याच नावाची (महिला कार्यकर्ती) वर्णी लागणार का, याबाबतही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

उपनगराध्यक्ष आणि शिवसेनेच्या दोन स्वीकृत नगरसेवकपदांचा अंतिम निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याने, स्थानिक पातळीवरील सर्व हालचाली थेट मुंबईकडे वळल्या आहेत. दुसरीकडे भाजपकडूनही स्वीकृत नगरसेवकपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असून, सत्ताधारी आघाडीतील समन्वय आणि सामंजस्याची कसोटी या निर्णयातून लागणार आहे. एकूणच, पालघर नगर परिषदेतील हा सत्तासंघर्ष आगामी स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे.

संभाव्य स्वीकृत उमेदवार : रवींद्र म्हात्रे, सुभाष म्हात्रे (शिवसेना)

उपनगराध्यक्ष संभाव्य उमेदवार : चंद्रशेखर ऊर्फ बंड्या वडे, राजेंद्र पाटील, अमोल पाटील आणि अन्य नगरसेवक सुद्धा

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button