पालघर :
पालघर नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा कायदेतज्ज्ञ ॲड. जयेश आव्हाड यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली आहे. पक्ष संघटनात्मक कामकाजात त्यांचा प्रदीर्घ अनुभव, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि प्रामाणिकपणा लक्षात घेऊन भाजप नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज अचूक व नियमबद्ध पद्धतीने भरणे ही जबाबदारी ॲड. आव्हाड यांनी अत्यंत कौशल्याने पार पाडली आहे. त्यांनी आजवर भरलेला एकही निवडणूक अर्ज बाद न झाल्याची त्यांची ख्याती आहे. वकिली पेशासोबत निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कायदेशीर बाबींमध्ये ते पारंगत असून, उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या कामाशी असलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळेच त्यांच्या गळ्यात स्वीकृत नगरसेवकपदाची माळ पडल्याचे बोलले जात आहे.
पालघर नगर परिषदच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ॲड. आव्हाड इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी पक्षनेतृत्वाने दुसऱ्या उमेदवाराची निवड केली असतानाही त्यांनी कोणतीही नाराजी न दर्शवता पक्षनिष्ठा जपली. उलटपक्षी, पक्षाने त्यांच्या कार्याची योग्य पोचपावती देत त्यांना स्वीकृत नगरसेवकपद दिले, अशी भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
सामाजिक क्षेत्रातही ॲड. आव्हाड यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी रोटरी क्लब ऑफ पालघरचे अध्यक्षपद भूषविले असून, जिल्हास्तरावर विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. अनेक विकासाभिमुख योजना त्यांनी प्रत्यक्षात उतरवल्या असून, प्रशासन व समाज यांच्यात समन्वय साधण्याचे काम केले आहे.
ॲड. जयेश आव्हाड यांची स्वीकृत नगरसेवकपदी झालेली निवड ही भाजपसाठी आश्वासक मानली जात असून, आगामी काळात पालघर शहराच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
