माझी वसुंधरा अभियानात नावझे ग्रामपंचायतीचा राज्यात प्रथम क्रमांक

मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांच्या हस्ते वितरण

पालघर : 

राज्य शासनाच्या पर्यावरणपूरक व लोकसहभागावर आधारित माझी वसुंधरा 5.0 अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत पालघर तालुक्यातील नावझे ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, जलव्यवस्थापन, हरित क्षेत्र वाढ, कचरा व्यवस्थापन आणि नवीकरणीय ऊर्जेचा वापर अशा विविध निकषांवर नावझे ग्रामपंचायतीने केलेले नियोजनबद्ध व प्रभावी कार्य या यशामागे ठळकपणे दिसून येते.

गावात घनकचरा वर्गीकरण, ओला-सुका कचरा वेगळा संकलन, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, जलसंधारणाची कामे, पावसाचे पाणी साठवण तसेच नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती यांसारखे उपक्रम सातत्याने राबविण्यात आले. या सर्व कामांमध्ये लोकसहभागाला प्राधान्य देण्यात आल्याने अभियान केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरले.

या उल्लेखनीय यशामध्ये सरपंच दामोदर सुकऱ्या लाबड व उपसरपंच प्रफुल वसंत पाटील यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले. ग्रामपंचायत अधिकारी सौ. मानसी मयूर लाटे यांच्या कार्यक्षम प्रशासनामुळे आणि काटेकोर नियोजनामुळे विविध उपक्रम वेळेत व गुणवत्तापूर्णरीत्या पूर्ण झाले. ग्रामपंचायत सदस्य संदीप पांडुरंग पाटील, सौ. सुहानी सुधाकर पाटील, सौ. पुनम प्रकाश सोगले, सौ. सरिता सखाराम कोम, सौ. मनस्वी महेश जाधव, सौ. प्राची पाटील, दीपक जाधव, दीपेश जाधव यांनीही सक्रिय सहभाग घेत अभियान यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

याशिवाय ग्रामपंचायत कर्मचारी रोशन भोईर, संजय दोडे, अविष्का पाटील, सौ. प्रणाली पाटील, सौ. वेदिका जाधव, सौ. प्रांजल पाटील यांची मेहनत उल्लेखनीय ठरली. अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस, शिक्षकवृंद, आशा व आशा सुपरवायझर, एएनएम, विद्यार्थी, बचत गट, सीआरपी, कृषक बचत गट तसेच ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्याने हा उपक्रम अधिक व्यापक झाला.

नावझे ग्रामपंचायतीने मिळवलेला हा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा मान इतर ग्रामपंचायतींसाठी दिशादर्शक ठरणारा असून, पर्यावरण संरक्षणासाठी लोकसहभागातून केलेले प्रयत्न किती प्रभावी ठरू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.

माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळा – शनिवारी २१ फेब्रुवारी, २०२६, वेळ : दुपारी १२ वाजता, कार्यक्रमाच्या वेळेपूर्वी अर्धातास आधी उपस्थित रहावे. स्थळः डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, लाला लजपत राय मार्ग, वरळी, मुंबई ४०००१८.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button