छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात ३९६ वी शिवजयंती उत्साहात साजरी

पनवेल शेडूंग येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ येथे ३९६ वी शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. “शिवगर्जना”च्या घोषणांनी कार्यक्रमाची सुरुवात होताच संपूर्ण परिसरात ऊर्जा आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.

यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात साजऱ्या झालेल्या या सोहळ्याने उपस्थितांमध्ये उत्साहाची लाट उसळली. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून विविध सांस्कृतिक उपक्रमांची रंगतदार मांडणी करण्यात आली.

राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाने सादर केलेल्या नाटिकेला विशेष दाद मिळाली. विद्यार्थ्यांनी समूह नृत्याद्वारे आपली कला सादर केली, तर प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सादर केलेल्या तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. या सादरीकरणांना प्रेक्षकांकडून जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला.

यावेळी कुलगुरू, कुलसचिव आणि अध्यक्ष यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य आणि राष्ट्रप्रेमाच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. भाषण स्पर्धेतील विजेत्यांनीही आपले विचार मांडत उपस्थितांना प्रेरित केले.कार्यक्रमाचा समारोप पारितोषिक वितरणाने झाला. सर्वोत्कृष्ट वेशभूषा, प्रश्नमंजुषा, भाषण स्पर्धा आणि ट्रेझर हंट यांसारख्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. एकतेची भावना आणि अभिमानाचा संदेश देणारा हा सोहळा प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button