भगिनी समाज शाळेत ‘आकाश निरीक्षण’ सोहळा; विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासेला चालना

पालघर : भगिनी समाज शाळा येथे विज्ञाननिष्ठ विचार आणि अवकाशाविषयी कुतूहल वाढवणारा ‘आकाश निरीक्षण’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. भगिनी समाज विज्ञान टॅलेंट सर्च परीक्षेच्या निमित्ताने आयोजित बक्षीस समारंभ व आकाश निरीक्षण या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ज्ञान, अनुभव आणि प्रेरणेचा अनोखा संगम अनुभवता आला.

इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेली विज्ञान टॅलेंट सर्च परीक्षा स्कॉलरशिप व नवोदयसारख्या स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर घेण्यात आली होती. या परीक्षेतून निवड झालेल्या ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मात्र, कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दुर्बिणीतून आकाश निरीक्षणाची मिळालेली संधी.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अवकाश अभ्यासक भूषण नोकती यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सूर्यावरील सनस्पॉट्स, चंद्रावरील खड्डे, टर्मिनेटर रेषा, तसेच शुक्र व गुरु ग्रहांचे निरीक्षण केले. सप्तर्षी समूह आणि द्वितारा प्रणालीचेही दर्शन विद्यार्थ्यांनी घेतले. या अनुभवातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारांची जिज्ञासा निर्माण झाली.

मार्गदर्शनपर भाषणात नोकती यांनी निरीक्षण, प्रश्ननिर्मिती, प्रयोग आणि निष्कर्ष या वैज्ञानिक पद्धतीचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच NASA सारख्या संस्थांमधील संशोधन आणि भविष्यातील करिअर संधींबाबत माहिती दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष दीपा लोखंडे होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा व अफवांवर मात करण्यासाठी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. स्पर्धेत इयत्ता सातवीत समिधा पाटील प्रथम, मृणाली खरपडे द्वितीय व शरण्या वर्दे तृतीय ठरल्या. सहावीमध्ये चैतन्य पाटील, अंश शिंपी व आदित्य डेंगणे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.कार्यक्रमास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह मुख्याध्यापिका प्रीती वर्तक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारांची बीजं रोवणारा ठरला.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button