पालघर : रोटरी क्लबच्या वतीने पालघर येथील आरोग्यम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चौथ्या डायलिसिस सेंटरचे उद्घाटन रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संदीप अग्रवाला यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

या नव्या डायलिसिस सेंटरमध्ये रोटरीतर्फे चार अत्याधुनिक डायलिसिस मशीन तसेच आरओ प्लांट बसविण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील गरजू रुग्णांना परवडणाऱ्या दरात व दर्जेदार उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे.
रोटरी क्लब ऑफ बॉम्बेच्या वतीने पालघर, मनोर आणि बोईसर या भागांमध्ये आतापर्यंत एकूण 20 डायलिसिस मशीन देण्यात आल्या असून, पालघर व मुंबई परिसरात मिळून 105 मशीनचे दान करण्यात आले आहे. क्लबच्या शताब्दी वर्षानिमित्त 2029 पर्यंत 200 डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रमुख पाहुणे संदीप अग्रवाला यांनी यावेळी सांगितले.

रोटरी क्लब ऑफ पालघरच्या सहयोगाने हे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले. क्लब तर्फे पूर्वी सन 2014 मध्ये ढवळे हॉस्पिटल पालघर येथे पहिले डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले असून तिथे 11 मशीन कार्यान्वित आहे, तर कोविड काळात 2020 मध्ये आस्था हॉस्पिटल मनोरे येथे दुसरे सेंटर सुरु करण्यात आले असून तिथे 5 मशीन्स कार्यान्वित असल्याची माहिती रोटरी जिल्हा मुख्य समन्वयक भगवान पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ बॉम्बेच्या डायलिसिस कमिटीच्या चेअरमन स्वाती जजोडिया, DHSK कनोऱिया फाउंडेशनच्या रुचिरा देसाई, रोटरी जिल्हा मुख्य समन्वयक भगवान पाटील, रोटरी क्लब ऑफ पालघरचे अध्यक्ष संजय महाजन, सचिव मनीष पिंपळे, मेडिकल डायरेक्टर डॉ. भावेश पाटील, असिस्टंट गव्हर्नर प्रशांत पाटील तसेच आरोग्यम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. कुणाल दोशी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे पालघर मधील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, रोटरीच्या समाजसेवेचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.
