गुहिर, दि. २८ एप्रिल : Sachin Tendulkar आणि Schneider Electric India यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेल्या ‘स्प्रेडिंग हॅपिनेस इंडिया फाउंडेशन’ (SHIF) च्या माध्यमातून महाराष्ट्रातील गुहिर गावाचा सर्वांगीण कायापालट करण्यात आला असून गावाला ‘क्लायमेट स्मार्ट व्हिलेज’ म्हणून ओळख मिळाली आहे. ग्रामीण भागात स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देत शाश्वत उपजीविका निर्माण करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी ४० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प IoT-सक्षम स्मार्ट पॉवर मॅनेजमेंट सिस्टीमशी जोडलेला असून मागणीनुसार वीजपुरवठा सुनिश्चित करतो. या ऊर्जेचा वापर सिंचन पंप तसेच कृषी-प्रक्रिया युनिट्ससाठी केला जात आहे. भात मळणी, तांदूळ गिरणी आणि मसाला प्रक्रिया युनिट्स महिला-नेतृत्वाखालील शेतकरी उत्पादक संघटनेमार्फत (FPO) चालवली जात असून स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळत आहे.
या उपक्रमामुळे गावातील ११३ कुटुंबे, सुमारे २५ पथदिवे आणि अत्यावश्यक सेवा लाभान्वित झाल्या आहेत. स्थानिक अंगणवाडीचे विद्युतीकरण करण्यात आल्याने ३० हून अधिक मुलांना याचा फायदा होत आहे. सौर पंपांमुळे सिंचन क्षेत्र वाढले असून शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्नही वाढले आहे.यावेळी सचिन तेंडुलकर म्हणाले, “SHIF चा उद्देश समाजात संधी निर्माण करून सन्मानाने जगण्याची क्षमता देणे हा आहे. गुहिरमध्ये तंत्रज्ञानासोबत समाजाचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. महिलांचे नेतृत्व, शेतकऱ्यांची वाढती उत्पादकता आणि मुलांना मिळणाऱ्या संधी हे सर्वसमावेशक विकासाचे प्रतीक आहे.
”श्नाइडर इलेक्ट्रिक इंडियाचे झोन प्रेसिडेंट – ग्रेटर इंडिया व सीईओ दीपक शर्मा यांनी, “स्वच्छ ऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठा बदल घडवता येतो, याचे गुहिर हे उत्कृष्ट उदाहरण आहे,” असे नमूद केले.BAIF Institute for Sustainable Livelihoods and Development (BISLD) च्या सहकार्याने राबवलेल्या या प्रकल्पातून सिंचित क्षेत्र वाढ, कृषी-प्रक्रिया सक्षमीकरण आणि २४x७ स्वच्छ ऊर्जा उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. महिला-नेतृत्वाखालील व समुदाय-आधारित व्यवस्थापनामुळे गावात सामुदायिक मालकीची भावना निर्माण झाली आहे.
उद्घाटन प्रसंगी सचिन तेंडुलकर यांनी कुटुंबासह गावाला भेट देत शेतकरी, महिला उद्योजिका आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्रामपंचायतीच्या सरपंच सरीता संतोष गायककर यांनी सांगितले की, “सौर ऊर्जेच्या प्रकल्पामुळे शेतीसाठी पाणी, प्रक्रिया युनिट्स आणि अखंड वीज उपलब्ध झाली असून ग्रामस्थांना मोठा फायदा झाला आहे.”गुहिरचे हे मॉडेल आता राज्यासह देशासाठी प्रेरणादायी ठरत असून स्वच्छ ऊर्जा, शाश्वत विकास आणि हवामान लवचिकतेचा नवा आदर्श निर्माण करत आहे.
