एलआयसी कॉर्पोरेट क्लब परिषदेकरिता पालघरच्या नारायण गिरासे यांची निवड

पालघर : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) प्रतिष्ठित कॉर्पोरेट क्लब मेंबर्स परिषदेसाठी पालघरचे ज्येष्ठ विमा सल्लागार नारायण भिका गिरासे यांची निवड झाली. देशभरातील केवळ २०० उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांना या क्लबचे सदस्यत्व मिळते. यंदा ही आंतरराष्ट्रीय परिषद जपानमध्ये आयोजित करण्यात आली होती.

नारायण गिरासे हे सन २०१३-१४ पासून सातत्याने एलआयसीच्या कॉर्पोरेट क्लबचे सदस्य आहेत. विमा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, ग्राहकांशी जपलेले विश्वासाचे नाते आणि सातत्यपूर्ण यश यामुळे त्यांची या प्रतिष्ठित परिषदेसाठी निवड करण्यात आली. परिषदेत सहभागी होताना त्यांना जगभरातील विमा व्यवसायातील नव्या संकल्पना, आधुनिक तंत्रज्ञान, ग्राहक सेवा आणि जागतिक विमा क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांची सविस्तर माहिती मिळाली.

याबाबत बोलताना नारायण गिरासे यांनी सांगितले की, “एलआयसीच्या विविध उपलब्धी आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे माझी या परिषदेसाठी निवड झाली. वर्षातून एक ते दोन वेळा विविध देशांमध्ये अभ्यास दौरे आयोजित केले जातात. या दौऱ्यांमधून विमा व्यवसायातील नव्या संधी आणि आंतरराष्ट्रीय अनुभव मिळतो.

”गिरासे यांनी आतापर्यंत सुमारे ४० देशांचा अभ्यास दौरा पूर्ण केला असून विविध देशांतील विमा व्यवस्थापन, ग्राहक सेवा आणि आर्थिक नियोजनाच्या पद्धतींचा अभ्यास केला आहे. जपानमध्ये झालेल्या परिषदेत जगभरातील विमा क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

पालघरसारख्या ग्रामीण भागातून पुढे येत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर यश संपादन करणाऱ्या नारायण गिरासे यांच्या या कामगिरीमुळे पालघर जिल्ह्याचा गौरव वाढला असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button