पालघर, दि. २८ एप्रिल : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ हा नागरिकांना सक्षम करणारा आणि प्रशासन अधिक पारदर्शक व उत्तरदायी बनविणारा क्रांतिकारी कायदा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी रणजित देसाई, रविंद्र राजपूत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश गोरे, उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर पाटील, तहसीलदार नरेंद्र माने यांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देत पारदर्शक, जबाबदार आणि कालबद्ध सेवा वितरणाचा संदेश देण्यात आला. “नागरिकांना शासकीय सेवा ठराविक कालमर्यादेत मिळणे हा त्यांचा हक्क असून, त्यासाठी डिजिटल माध्यमांचा अधिकाधिक वापर करण्यावर शासनाचा भर आहे,” असे जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी स्पष्ट केले.
या कायद्यानुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने सेवा, जबाबदार अधिकारी आणि निश्चित कालमर्यादा अधिसूचित करणे बंधनकारक आहे. सेवा नाकारल्यास किंवा विलंब झाल्यास नागरिकांना अपील करण्याचा अधिकार देण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूदही आहे.
कार्यक्रमादरम्यान सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि तत्परतेने सेवा देण्याची शपथ घेतली. नागरिकांना सुलभ सेवा मिळण्यासाठी आपले सरकार पोर्टल चा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले. या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज, स्थिती तपासणी व तक्रार निवारण सुविधा उपलब्ध आहेत.
सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाने नागरिकाभिमुख सेवांसाठी नव्याने वचनबद्धता व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
