पालघर : सोनोपंत दांडेकर महाविद्यालय येथे ‘पर्यावरणीय शाश्वतता, सामाजिक प्रगती आणि सुशासन : भारताचे व्हिजन-२०४७ (ESSG-2047)’ या विषयावर एकदिवसीय बहुविषयक आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. ही परिषद प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच PM-USHA अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

परिषदेच्या उद्घाटन सत्रात मुंबई विद्यापीठ येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. लियाकत खान यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते म्हणून सॅलिसबरी युनिव्हर्सिटी (अमेरिका) येथील व्हिजिटिंग प्राध्यापक डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी “भारताची 2047 ची दृष्टी” या विषयावर सखोल विचार मांडले. तसेच भूगोलतज्ञ डॉ. हेमंत पेडणेकर यांनी शाश्वत विकास व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.
विविध तांत्रिक सत्रांमध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील प्रा. (डॉ.) संभाजी शिंदे, ह्युस्टन (अमेरिका) येथील विजयानंद शेलवराज, डॉ. ज्योतिराम मोरे आणि IIMT University येथील डॉ. तुष्टी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. पर्यावरणीय शाश्वतता, सामाजिक प्रगती आणि सुशासन या विषयांवर विविध पैलूंवर चर्चासत्रे झाली.
या परिषदेत देश-विदेशातील संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गेला. सुमारे २४० संशोधनपत्रे सादर करण्यात आली. अंतिम सत्रात संशोधकांनी पीपीटीद्वारे ऑनलाईन सादरीकरण केले. कला, वाणिज्य व विज्ञान अशा तीन गटांमधून उत्कृष्ट शोधनिबंध सादर करणाऱ्या संशोधकांचा सन्मान करण्यात आला.
परिषदेचे प्रमुख आयोजक प्राचार्य डॉ. किरण सावे होते. समन्वयक म्हणून डॉ. महेश देशमुख, तर संयोजक म्हणून प्रा. (डॉ.) तानाजी पोळ, डॉ. बाळासाहेब राहाणे, डॉ. हर्षद वनमाळी आणि सहा. प्रा. रामदास येडे यांनी कार्यभार सांभाळला. संस्थेचे अध्यक्ष सीए. सचिन कोरे, उपाध्यक्ष सुधीर दांडेकर व इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे परिषद यशस्वी ठरली.
