पालघर : सेवायोजन कार्यालय (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे) कायदा, १९५९ व नियम, १९६० अंतर्गत पालघर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नमुना ईआर-१ (ER-1 Quarterly Return) मध्ये ही माहिती विहित मुदतीत सादर करावी लागणार असून, मार्च २०२६ अखेर संपणाऱ्या तिमाहीसाठी ३० एप्रिल २०२६ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघरमार्फत या प्रक्रियेचे संकलन सुरू असून, सर्व आस्थापनांकडून शंभर टक्के प्रतिसाद अपेक्षित आहे. कायद्याच्या कलम ५(१) नुसार सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय व निमशासकीय आस्थापना, तसेच कलम ५(२) अंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण संख्या अचूकपणे सादर करणे आवश्यक आहे.ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या ‘महास्वयंम’ पोर्टलवर ऑनलाईन भरावी लागणार आहे. यासाठी संबंधितांना पूर्वीच युजरनेम व पासवर्ड देण्यात आले असून, लॉगिन करून माहिती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणी न केलेल्या आस्थापनांनी तातडीने नोंदणी पूर्ण करावी. विहित मुदतीत माहिती सादर करून कायद्याचे पालन करावे, असे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
