टाटा स्टीलमध्ये ५० स्थानिक कामगार कायम, श्रमिक उत्कर्ष सभेच्या पाठपुराव्याला यश

पालघर : तारापूर एमआयडीसीतील मे. टाटा स्टील लि. (तारापूर वायर प्लांट-२) येथे स्थानिक कामगारांच्या कायम नोकरीसाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, पहिल्या टप्प्यात ५० कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात आले आहे. याबाबत आमदार तथा कामगार नेते प्रसाद लाड यांनी समाधान व्यक्त केले.

तारापूर एमआयडीसीतील हा कारखाना उद्योग निर्मिती तसेच बांधकामासाठी लागणाऱ्या रोप वायर उत्पादनासाठी विशेष ओळख निर्माण करून आहे. देश-विदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या या उत्पादनामुळे टाटा समूहात काम करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक कामगार कायम नोकरीपासून वंचित राहिले होते.

याबाबत व्यवस्थापनाशी सातत्याने संवाद आणि पाठपुरावा केल्यानंतर पहिल्या टप्प्यात ५० कामगारांना कायम करण्यास यश मिळाल्याचे प्रसाद लाड यांनी सांगितले. “ठेकेदारी आणि फिक्स टर्मच्या युगात कामगारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत संघटनेची सांघिक व सकारात्मक भूमिका आणि व्यवस्थापनाचे सहकार्य यामुळे हे शक्य झाले,” असे त्यांनी नमूद केले. कामगारांना कायम नोकरीची पत्रे वाटप करण्याचा कार्यक्रम कारखान्यात पार पडला. यावेळी कामगारांनी आनंदोत्सव साजरा करत समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाला संघटनेचे सरचिटणीस भालचंद्र साळवी, उपाध्यक्ष महेश सावंत, सचिव प्रशांत पाटील, प्रणय म्हात्रे, मुकेश तसेच टाटा व्यवस्थापनाच्या वतीने सतीश वालेकर, गणेश हेरोडे, अनिषा प्रामाणिक, सुहास साळुंखे, प्रतीक पटेल उपस्थित होते. तसेच संघटना प्रतिनिधी अजय ढेकणे, किरण सावंत, मनोज मोरे, किरण सोनावणे, प्रशांत साळसकर, राजन सावंत, संदीप शिंदे आणि कायम नोकरी मिळालेले कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button