दूषित सांडपाण्याचा फटका; नेहरोलीतील शेतकरी लाखोच्या नुकसानीत

रासायनिक पाणी तात्काळ बंद करून नुकसानभरपाईची मागणी
वाडा / प्रतिनिधी : तालुक्यातील नेहरोली गावात कार्यरत असलेल्या हरी सन स्टील कंपनीमुळे स्थानिक शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणावर भंगार वितळवून सळई (स्टील रॉड) तयार करण्याचे काम केले जाते. मात्र, या प्रक्रियेतून बाहेर पडणारे केमिकलयुक्त, पांढऱ्या रंगाचे दूषित सांडपाणी थेट शेतजमिनीत सोडले जात असल्याचा आरोप आहे.


हे सांडपाणी अंकुश पाटील या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन साचत असल्याने त्यांची सुपीक जमीन पूर्णपणे नापीक झाली आहे. या जमिनीतून पूर्वी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत होते, मात्र सध्या कोणतेही पीक येत नसल्याने शेतकऱ्यावर जमीन ओसाड ठेवण्याची वेळ आली आहे.


या प्रकरणी शेतकऱ्याने अनेक वेळा प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच कंपनी मालकाला वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.


दरम्यान, संबंधित कंपनीने तात्काळ रासायनिक सांडपाणी सोडणे बंद करावे आणि शेतकऱ्याला झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी ठाम मागणी अंकुश पाटील यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button