जिल्हा बँक निवडणुकीत बंदरपट्टीचा बुलंद आवाज ठरले अनिल गावड

निर्णायक ठरले अवघे एक मत, विद्यमान संचालक नागेश पाटील यांच्यावर मात

पालघर : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालघर तालुका कृषी पतपुरवठा विकास सहकारी सेवा गटातून अनिल माधवराव गावड यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत विजय मिळवत राजकीय व सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या विजयामुळे पालघर तालुक्यातील बंदरपट्टी भागाला अनेक वर्षांनंतर प्रथमच या बँकेत प्रतिनिधित्व मिळाले आहे.

महाराष्ट्रातील अव्वल आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाची जिल्हा बँक म्हणून ओळख असलेल्या ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक शनिवारी पार पडली. रविवारी जाहीर झालेल्या निकालात पालघर तालुका कृषी पतपुरवठा विकास सहकारी सेवा गटात अनिल गावड आणि विद्यमान संचालक नागेश पाटील यांच्यात थेट सामना झाला.

या गटात एकूण ५४ मतदार होते. त्यापैकी अनिल गावड यांना २७ मते मिळाली, तर नागेश पाटील यांना २६ मतांवर समाधान मानावे लागले. एक मत अवैध ठरल्याने गावड यांचा केवळ एका मताने थरारक विजय निश्चित झाला.

या विजयामुळे अनिल गावड समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, गावड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सहकार क्षेत्रात बंदरपट्टीच्या प्रश्नांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button