वाड्यात घरफोडी टोळीचा पर्दाफाश; २४ तासांत पोलिसांची धडक कारवाई, तीन आरोपी जेरबंद

वाडा/प्रतिनिधी : 

वाडा तालुक्यातील देवघर येथील घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. चोरी गेलेले लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करताना आरोपींकडून आणखी गुन्ह्यांचीही धक्कादायक कबुली मिळाली आहे.

तालुक्यातील देवघर येथील नरेश पाटील हे २८ मार्च रोजी नातेवाईकांच्या उत्तरकार्याच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले असताना त्यांच्या बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी केली होती. घरातील बेडरूममधील लाकडी कपाटातून सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर वाडा पोलिसांनी या गुन्ह्याचा वेगाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी संशयित प्रणित ऊर्फ भुया ऊर्फ टोल्या सुनील पाटील याच्यावर पाळत ठेवली. तो कोणताही व्यवसाय न करता ऐशोआरामी जीवन जगत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. गुप्त माहितीच्या आधारे त्याच्या घराची झडती घेतली असता देशी बनावटीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. मात्र, त्यावेळी तो अंधाराचा फायदा घेत फरार झाला.

पोलिसांनी कसून शोध घेऊन अवघ्या २४ तासांत प्रणित याला पकडले. त्याच्यासह त्याचा साथीदार अजित ऊर्फ बाली प्रकाश पाटील (वय ३५) आणि सारिका पाटील यांनाही अटक करण्यात आली. आरोपींकडून २ लाख १६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच या टोळीने आणखी चार घरफोड्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी एस. एस. मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर करीत आहेत.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button