वाडा/प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात सुमारे 40 गावपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. महिलांना दररोज अनेक किलोमीटर अंतर पार करून पाणी आणावे लागत असल्याने त्यांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. वाढत्या उष्णतेमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
या समस्येकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असला, तरी तो अपुरा व अनियमित असल्याची तक्रार आहे. अनेक गावांपर्यंत टँकर पोहोचत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.श्रमजीवी संघटनेने तात्काळ नियमित पाणीपुरवठा, टँकरचे योग्य नियोजन, प्रलंबित बोअरवेल व नळपाणी योजनांची कामे वेगाने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास 20 एप्रिल रोजी पंचायत समिती वाडा येथे ‘हंडा मोर्चा’ काढण्याचा इशारा अध्यक्ष भरत जाधव व सचिव सुरज दळवी यांनी दिला आहे.
