पालघर : पालघरसह संपूर्ण कोकण पट्ट्यातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्रवाशांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, ट्रेन क्रमांक 09057 / 09058 सुरत–मंगळूरू जंक्शन–सुरत स्पेशल गाडीचे आता नियमित द्विसाप्ताहिक एक्सप्रेसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानुसार, ही गाडी ३ जून २०२६ पासून सुरत येथून आणि ४ जून २०२६ पासून मंगळूरू जंक्शन येथून नियमित धावणार आहे.नवीन क्रमांकानुसार गाडी क्र. 19057 सुरत–मंगळूरू जंक्शन द्विसाप्ताहिक एक्सप्रेस दर बुधवारी आणि रविवारी संध्याकाळी ७:३५ वाजता सुरत येथून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७:४५ वाजता मंगळूरू जंक्शन येथे पोहोचेल. तर गाडी क्र. 19058 मंगळूरू जंक्शन–सुरत द्विसाप्ताहिक एक्सप्रेस दर गुरुवारी आणि सोमवारी रात्री १०:३० वाजता मंगळूरूहून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११:४५ वाजता सुरत येथे पोहोचणार आहे.
या गाडीला पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ यांसह कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे पालघर ते कोकण आणि पुढे कर्नाटककडे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः रोजगार, शिक्षण, पर्यटन आणि नातेवाईकांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अधिक सोयीची ठरणार आहे.
या एक्सप्रेसमध्ये २ एसी टू-टियर, ७ एसी थ्री-टियर, ६ स्लीपर, ४ जनरल आणि २ एसएलआर/डी डब्यांसह एकूण २० डब्यांची सुविधा उपलब्ध असणार आहे. कोकण मार्गावरील प्रवाशांसाठी ही रेल्वे सेवा महत्त्वाची ठरणार असून, नियमितीकरणामुळे प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी होणार असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
