६ जून शिवराज्याभिषेक दिनी जुन्या-नव्या शिवसैनिकांचे भावनिक एकत्रीकरण
पालघर : राजतंत्र वृत्तसेवा
राजकारणात निवडणुका येतात जातात. कार्यकर्ते नेते पक्ष बदलतात आणि विचारधारा वेगळ्या होतात. त्यातूनच् अनेक वर्षांचे जिवलग सहकारीही एकमेकांपासून दूर जातात. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांपुढे हे सर्व भेद विरघळून जातात, याचा प्रत्यय पालघरमध्ये ६ जून रोजी झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात पाहायला मिळाला.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पालघरमध्ये शिवरायांच्या दर्शनासाठी हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली. हॉटेल सद्गुरू मित्रमंडळ आणि पालघर प्रतिष्ठानच्या परिसरात दिवसभर शिवमय वातावरण होते. आकर्षक सजावट, भगवे ध्वज आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या राजकीय पक्षांत कार्यरत असलेले जुने शिवसैनिक एकाच ठिकाणी एकत्र आले.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचारांनी घडलेली ही पिढी आज विविध राजकीय वाटांवर असली, तरी शिवरायांच्या चरणी ती पुन्हा एकत्र उभी राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. ते सुद्धा स्वर्गवासी हिंदु हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तसबिरीसच्या बाजूला…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पालघरचे नगराध्यक्ष उत्तम घरत, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, त्यांच्यासोबतचे नगरसेवक चंद्रशेखर वडे, अमोल पाटील तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गिरीश राऊत, नगरसेवक आरिफ कलाडिया, माजी नगरसेवक जितू पामाळे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा कदम, पदाधिकारी दिलू देसाई, पालघर प्रतिष्ठानचे सुनील महेंद्रकर, ज्येष्ठ पत्रकार माजी नगरसेवक रमाकांत पाटील, अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन शिवरायांना अभिवादन केले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि आपुलकीची नाती पुन्हा अनुभवली.
शिवरायांचे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण हॉटेल सद्गुरू अर्थात सध्याच्या नवीन उडुपी हॉटेलमध्ये चहा-नाश्त्यासाठी सुद्धा एकत्र बसले. त्या क्षणी पद, पक्ष आणि राजकीय सीमा मागे पडल्या होत्या; उरली होती ती फक्त मैत्री, शिवप्रेम आणि जुन्या सहवासाची ऊब.
नगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या राजकीय स्पर्धेमुळे दुरावलेले अनेक चेहरे ६ जूनच्या या सोहळ्यात पुन्हा एकत्र दिसले. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ शिवराज्याभिषेकाचा उत्सव न राहता, तुटलेली नाती जोडणारा आणि शिवरायांच्या विचारांनी मनांना एकत्र आणणारा भावनिक सोहळा ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.
