कळवा : निसर्ग, आकाश आणि वन्यजीव यांच्यातील नातं संवेदनशीलतेने जपण्याची गरज अधोरेखित करणारी ‘वन्यजीव-निसर्ग-साहस’ ही विशेष व्याख्यानमाला उत्साहात पार पडली. ‘राजाराम साळवी गौरव विचारमंच’तर्फे आयोजित या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करत उपस्थितांना विचारप्रवृत्त केले.

मनीषा विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात साळवी व पाटील यांच्या वन्यजीव आणि वनस्पती छायाचित्रांचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले होते. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सोमण यांनी मांज्यामुळे जखमी होणाऱ्या पक्ष्यांचा मुद्दा उपस्थित करत पर्यावरणाबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन केले. “आकाश हे उघडं पुस्तक आहे; ते वाचायला शिकायला हवं,” असे सांगत त्यांनी खगोल आणि निसर्ग यांचा सुंदर संगम मांडला.
कार्यक्रमात वन्यजीव प्रेमी साधना वझे यांनी ‘अर्जुन’ या बिबट्याचे दत्तकत्व घेतल्याचा अनुभव कथन केला. वन्यजीव अभ्यासक शैलेंद्र पाटील यांनी “जंगल रीडिंग”चे महत्त्व स्पष्ट करत प्राण्यांच्या हालचाली ओळखण्याचे कौशल्य अधोरेखित केले. त्यांच्या सादरीकरणातील स्लाईड शोने उपस्थितांना रोमांचक अनुभव दिला.
प्रदीप साळवी यांनी वनसंवर्धनावर भाष्य करत झाडे वाचविण्याचा संदेश दिला तसेच पक्षी अभयारण्य उभारण्याचा मनोदय व्यक्त केला. या कार्यक्रमात लाईव्ह टॉक शो, साहसी मोहिमांचे सादरीकरण आणि छायाचित्र प्रदर्शनामुळे व्याख्यानमाला एक समृद्ध अनुभवयात्रा ठरली.
प्राचार्य डॉ. धनंजय पष्टे यांनी प्रास्ताविक केले. उपवनसंरक्षक, वन अधिकारी, विविध संस्था प्रतिनिधी व मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.
