पालघर : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सातीवली विभागीय कार्यालयात कार्यरत असलेले लिपिक (वर्ग-३) दिलीप लक्ष्मण लोखंडे (वय ५२) यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) ठाणे विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महानगरपालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना अधिकारपत्र दिलेल्या जागेवर एका व्यक्तीने कथितरित्या बेकायदेशीर कब्जा करून झाडांची विनापरवाना तोड केली होती. या प्रकरणात संबंधित व्यक्तीवर नोटीस बजावून कायदेशीर कारवाई करण्यासाठी सातीवली विभागीय कार्यालयातील घरपट्टी व वृक्ष प्राधिकरण विभागात कार्यरत असलेले लिपिक दिलीप लोखंडे यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती.तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी २७ मे २०२६ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर २८ मे रोजी करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये लोखंडे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर एसीबीच्या पथकाने २ जून रोजी सापळा रचला. सायंकाळी ५.२० वाजण्याच्या सुमारास सातीवली येथील विभागीय कार्यालयात तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लोखंडे यांना रंगेहात पकडण्यात आले.या प्रकरणी लोखंडे यांना ताब्यात घेण्यात आले असून वालीव पोलीस ठाण्यात स्टेशन डायरी नोंद करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे.
