
माझी आई श्रीमती सुलोचना वामन तावडे (वय वर्षे ८७) यांचे १५ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले आणि आमच्या आयुष्यातील एक भक्कम आधार, एक न थकणारी सावली हरपली. आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नसते, तर आयुष्याला आकार देणारी, संस्कारांची शिदोरी देणारी आणि संकटात ढाल बनून उभी राहणारी शक्ती असते. आमच्यासाठी आई हेच सर्वस्व होते. वडील २०२० मध्ये आमच्यातून निघून गेल्यानंतर, संपूर्ण घराची जबाबदारी, भावनिक ताकद आणि धीर एकट्या आईनेच पेलला. ती आमची ढाल बनली, आमचा आधार बनली. आज 26 जानेवारी 2026 रोजी तिला जाऊन 12 दिवस होत आहेत, त्यानिमित्ताने….!
आई अत्यंत कष्टाळू, दयाळू, संयमी आणि संस्कारी होती. शिक्षणाचे महत्त्व तिला उमजलेले होते आणि म्हणूनच तिने आम्हा दोन्ही मुलांना – प्रदीप आणि मंगेश – शिक्षणाची, प्रामाणिकपणाची आणि आत्मविश्वासाची शिदोरी दिली. तिच्या संस्कारांमुळे आम्ही आयुष्यात कधीही कमी पडलो नाही, याचा आम्हाला अभिमान आहे.आई स्वतः शिक्षित होती. वाचन, लिखाण, अभंग, गौळणी, कविता यांची तिला विशेष आवड होती. ती केवळ वाचायचीच नाही, तर गायनातून शब्दांना आत्मा देत असे. घरात तिच्या आवाजात अभंग किंवा पाळण्याचे सूर घुमले की, घराला वेगळीच पवित्रता येत असे. लहान मुलांची पाळणी, अंगाई गीतं, नातवंडांसाठी सांगितलेल्या गोष्टी – या सगळ्यांत तिचे प्रेम ओसंडून वाहायचे.
माझे वडील वामन गंगाराम तावडे हे पारंपरिक भजन गायक होते. महाराष्ट्र राज्य शासन सांस्कृतिक खात्याकडून त्यांना मानधन मिळत असे. वडील गेल्यानंतर ते मानधन आईला देऊन शासनाने तिचाही सन्मान केला आहे. हा केवळ आर्थिक आधार नव्हता, तर तिच्या सहनशीलतेला, त्यागाला आणि संस्कृतीप्रेमाला दिलेली पावती होती.
आईचे माहेर मालवण तालुक्यातील वायंगवडे येथील. वडील रामचंद्र दौलत राणे आणि आई अनुसया रामचंद्र राणे यांचे संस्कार घेऊन ती आमच्या घरी आली. भाऊ, बहिणी, शेजारी, नातेवाईक, पै पाहुणे – सगळ्यांशी तिचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कुणीही घरी आले की, त्याचा पाहुणचार कसा करावा याची तिला पक्की जाणीव. तिच्या स्वयंपाकात केवळ चव नव्हती, तर प्रेम आणि आपुलकी मिसळलेली असायची.तिच्या आयुष्यात कष्ट, हालअपेष्टा, संघर्ष यांची कमी नव्हती. पण ती कधीही डगमगली नाही. संकटांसमोर उभी राहताना ती खर्या अर्थाने झाशीची राणी झाली. अश्रू गिळून, वेदना मनात ठेवूनही तिने आम्हाला कधीच कमकुवत होऊ दिले नाही. उलट, “डगमगायचं नाही” हेच तिने आम्हाला शिकवलं.
मुलांबरोबरच सुना आणि नातवंडे हे तिच्या जीवाचे तुकडे होते. नातवंडांच्या हास्यात तिला नवे आयुष्य सापडायचे. त्यांच्या प्रत्येक यशात, प्रत्येक छोट्या गोष्टीत तिचा आनंद दडलेला असायचा. घरातील प्रत्येक पिढीला एकत्र बांधून ठेवण्याचे काम तिने अखेरपर्यंत केले.आईचे ऋण शब्दांत मांडणे अशक्य आहे. तिच्या शिकवणीतून आम्हाला माणूसपण, नम्रता, कष्टाची किंमत आणि संस्कृतीची जपणूक मिळाली. आज ती आमच्यात शारीरिकरित्या नसली, तरी तिचे संस्कार आमच्या हृदयात कायमस्वरूपी घर करून आहेत.
आई गेल्यानंतर घर तसंच आहे, भिंती तशाच उभ्या आहेत; पण आधार कोसळल्याची जाणीव प्रत्येक क्षणी होते. तिचा आवाज थांबला असला, तरी आठवणी प्रत्येक कोपऱ्यात बोलत आहेत. स्वयंपाकघर, देवघर, अंगण – सगळीकडे तिची उपस्थिती जाणवते.आई…! तू दिलेले संस्कार, तू दाखवलेली दिशा आणि तू दिलेले प्रेम आमच्या आयुष्याचा मार्गदर्शक दिवा आहे. तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही. पण तुझ्या शिकवणीतूनच आम्ही पुढे चालत राहू, हाच तुला खरा अभिवादनाचा मार्ग आहे. तुझी आठवण सदैव आमच्या सोबत राहील… भावपूर्ण श्रद्धांजली. 🌺🙏
— (प्रदीप व मंगेश सुलोचना वामन तावडे आणि परिवार)7721994798
