पालघर शहरातील जनगणना प्रशिक्षणाकडे पाठ;पालघर नगर परिषद प्रशासनाचा ४६ शिक्षक, बीएलओ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा
पालघर : राजतंत्र वृत्तसेवा
जनगणना-२०२७ अंतर्गत घरयादी व घरगणना प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या ४६ शिक्षक, बीएलओ आणि कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने पालघर नगर परिषद प्रशासनाने कठोर भूमिका घेत संबंधितांवर जनगणना अधिनियम १९४८ व १९९० अंतर्गत कारवाई सुरू केली आहे.पालघर नगरपरिषद क्षेत्रात पहिल्या टप्प्यातील जनगणना प्रक्रिया राबविण्यासाठी दि. २४ एप्रिल ते ९ मे २०२६ या कालावधीत प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या. दूरध्वनी संदेश, लेखी नोटीस तसेच अन्य माध्यमांतून कळवूनही अनेक कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास हजेरी लावली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.राष्ट्रीय महत्त्वाच्या जनगणना कार्यात सहकार्य न करता टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासनाने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून इतर कर्मचाऱ्यांमध्येही धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.मुख्याधिकारी Dr. Prashant Jadhav यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत जनगणना कार्यात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगितले. राष्ट्रीय कर्तव्यात अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई अटळ असल्याचेही त्यांनी नमूद केले.
