पालघरच्या युवराज म्हात्रेची दिनेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट प्रशिक्षणासाठी निवड

पालघर : पालघर (शिरगाव) मधील श्री ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलचा होतकरू विद्यार्थी युवराज म्हात्रे (वय 10) याची भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा यांचे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील क्रिकेट प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने शाळा, पालक आणि पालघर (शिरगाव) परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.लहान वयातच क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत युवराजने आपल्या जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर ही संधी मिळवली आहे.

क्रिकेटमधील त्याची आवड, कौशल्य आणि मेहनत ओळखून त्याची निवड करण्यात आली असून ही बाब पालघरसाठी अभिमानास्पद मानली जात आहे.

युवराजच्या क्रिकेट प्रवासात पालघरचे प्रशिक्षक उदयन शुक्ला आणि ललित शुक्ला यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी युवराजमधील क्रिकेट कौशल्य ओळखून त्याला सातत्याने मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रशिक्षणामुळे युवराजच्या खेळात मोठी प्रगती झाली असून त्याचा आत्मविश्वासही वाढला आहे.

श्री ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलने केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची परंपरा जपली आहे. शाळेने देशातील विविध भागांतील अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणासह स्वप्नांना नवी दिशा दिली आहे. कर्जत, पालघर, कळवा, सावंतवाडी, दिल्ली, गुजरात, आंध्रप्रदेश, मुंबई, रत्नागिरी आणि महाराष्ट्रातील विविध भागांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सामाजिक आधार देण्याचे कार्य संस्थेकडून सातत्याने केले जात आहे.

युवराजच्या निवडीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असलेले अध्यक्ष सुजित पाटील सर यांनी युवराजच्या यशाचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

युवराज म्हात्रेने मिळवलेले हे यश पालघरमधील बाल क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी ठरणार असून भविष्यात तो राज्य आणि देशाचे प्रतिनिधित्व करून पालघरचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास सुजित पाटील सर यांनी व्यक्त केला आहे. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button