मंगेश वामन तावडे (राजतंत्र वृत्तसेवा)
सिंधुदुर्ग ही केवळ निसर्गसौंदर्याने नटलेली भूमी नाही, तर प्रशासन क्षेत्रातही मोठे कर्तृत्व घडवणारी भूमी आहे, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आयएएस अधिकारी अश्विनी भिडे आणि डॉ. भूषण गगराणी. या दोन्ही कर्तृत्ववान अधिकाऱ्यांचा प्रशासकीय प्रवास सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू झाला आणि आज ते राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत, ही बाब सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरून डॉ. भूषण गगराणी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी ज्येष्ठ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांना संधी देण्यात आली आहे. देशातील सर्वात जुनी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरी संस्था म्हणून ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. कर्तृत्ववान आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती होऊन त्या या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत. ही केवळ प्रशासकीय नेमणूक नसून, महिला सक्षमीकरणाचा आणि बदलत्या प्रशासनिक दृष्टिकोनाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
डॉ. भूषण गगराणी यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळताना प्रशासनात पारदर्शकता, शिस्त आणि लोकाभिमुखता यांचा उत्तम संगम साधला. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे अनेक विकासकामांना गती मिळाली. पुढे त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, महापालिकांचे आयुक्त, विविध खात्यांचे सचिव तसेच मुख्यमंत्री यांचे सचिव अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. प्रत्येक पदावर त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली आणि एक कर्तव्यनिष्ठ, अभ्यासू व दूरदृष्टी असलेला अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली. मुंबईचे आयुक्त म्हणून ते कार्यरत असून त्यांच्या अनुभवाचा लाभ देशातील आर्थिक राजधानीला झाला आहे.
दुसरीकडे, अश्विनी भिडे यांचा प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण विकास, शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला. कोकणचे नेते नारायणराव राणे त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यशैलीत काटेकोरपणा, नियोजनबद्धता आणि परिणामकारकता असल्याने श्रीमती भिडे यांचा विकासात्मक दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून होता. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या कामाची छाप उमटवली. पुढे मुंबई मेट्रोसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळत त्यांनी ‘मेट्रो वूमन’ अशी ओळख मिळवली. मुंबई शहराच्या प्रत्येक भागाची सखोल माहिती आणि प्रकल्प व्यवस्थापनातील कौशल्य यांच्या जोरावर त्यांनी अनेक आव्हाने यशस्वीपणे पार केल्याने आयुक्तपदाचा भार त्या समर्थपणे सांभाळतील यात शंका नाही.
मुंबईच्या आयुक्तपदी त्यांची झालेली नियुक्ती ही केवळ बढती नसून प्रशासनातील महिलांच्या नेतृत्वाला मिळालेली मोठी मान्यता आहे. महापौर रितू तावडे आणि आयुक्त अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांचे सशक्त प्रतिनिधित्व दिसून येत आहे. या ‘महिलाराज’कडून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
अश्विनी भिडे, डॉ. भूषण गगराणी यांचा प्रशासकीय प्रवास, तर मुंबईच्या महापौर सौ.रितू तावडे यांचा राजकीय प्रवास जरी मुंबईतून झाला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याशी जोडलेली नाळ हा विशेष अभिमानाचा विषय ठरतो. सिंधुदुर्गच्या या भूमीतून घडलेले अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आज मुंबईसह राज्याच्या प्रगतीत मोलाचे योगदान देत आहेत, हीच खरी सिंधुदुर्गच्या संस्कारांची ओळख आहे.
गगराणी , भिडे यांच्या कार्यातून एक स्पष्ट संदेश मिळतो की, प्रामाणिकपणा, कष्ट आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर कोणतीही व्यक्ती उच्च शिखरे गाठू शकते. अशा कर्तृत्ववान अधिकाऱ्यांमुळे प्रशासनाविषयी जनतेचा विश्वास अधिक दृढ होतो आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळते. सिंधुदुर्गच्या मातीतून उगवलेले हे तेजस्वी तारे आज महाराष्ट्राच्या आकाशात दिमाखात झळकत आहेत, याचा प्रत्येकाला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.
आयएएस अश्विनी भिडे यांच्या विषयी थोडेसे…. इतिहास रचणारी नेमणूक : अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त
अश्विनी भिडे यांनी आपल्या कारकिर्दीत कठोर परिश्रम, शिस्तबद्ध कामकाज आणि परिणामकारक निर्णयक्षमतेच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण विकासाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या. त्यानंतर मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या नेतृत्वातून त्यांनी जटिल प्रकल्प व्यवस्थापनात आपली क्षमता सिद्ध केली आणि ‘मेट्रो वूमन’ म्हणून लौकिक मिळवला.
मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहराचे प्रशासन चालवणे हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. कोट्यवधींची लोकसंख्या, विविध पायाभूत सुविधा, वाहतूक, स्वच्छता, आरोग्य व्यवस्था अशा अनेक घटकांचे समन्वय साधत शहराचा विकास साधावा लागतो. अशा परिस्थितीत अश्विनी भिडे यांच्यासारख्या अनुभवी आणि दूरदृष्टी असलेल्या अधिकाऱ्याची निवड ही योग्य दिशेने टाकलेले पाऊल मानले जात आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे प्रशासनात महिलांचे प्रतिनिधित्व अधिक बळकट झाले असून, निर्णयप्रक्रियेत संवेदनशीलता आणि परिणामकारकता यांचा समतोल साधला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महापौर रितू तावडे यांच्या सहकार्याने मुंबईच्या विकासाला नवी गती मिळेल, तसेच शहरातील विविध समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवल्या जातील, असा विश्वास नागरिकांना वाटत आहे.
अश्विनी भिडे यांची ही ऐतिहासिक कामगिरी केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाची कहाणी नाही, तर संपूर्ण देशातील महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या या यशामुळे प्रशासनातील महिलांना अधिक संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदले जाईल, यात शंका नाही.
- मंगेश वामन तावडे (संपादक, दैनिक राजतंत्र, पालघर) संपर्क : 7721994798
