पालघर, दि. 30 मार्च 2026 : राजतंत्र वृत्तसेवा
पालघर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित निरोप समारंभ अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दिनांक 30 मार्च रोजी जननायक बिरसा मुंडा सभागृह, जिल्हा परिषद पालघर येथे हा सोहळा मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगडे, उपजिल्हाधिकारी (सा) रणजीत देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य नीता पाटील, भावना विचारे, हबीब शेख यांच्यासह रवींद्र शिंदे यांचे वडील उद्धवराव शिंदे, पत्नी अनिता शिंदे, मुलगी हर्षाली शिंदे तसेच कुटुंबीय, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळच्या सत्रात राज्याचे वन मंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांनी श्री. शिंदे यांच्या प्रति गौरवोद्गार काढून त्यांचा आणि कुटुंबीयांचा सन्मान केला.

दुपारच्या सत्रात माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते रवींद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे यांच्या कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि लोकाभिमुख कार्यशैलीचे कौतुक करत, प्रशासनातील त्यांच्या ठाम निर्णयक्षमतेबरोबरच सर्वसामान्यांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचा विशेष उल्लेख केला. याच वेळी शिंदे यांच्या कुटुंबियांचाही सन्मान करण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत शिंदे यांच्यासोबतचे कार्यानुभव मांडले. “शिस्त आणि संवेदनशीलता यांचा सुंदर समतोल साधणारा अधिकारी म्हणून रवींद्र शिंदे यांची ओळख कायम राहील,” असे सांगत त्यांनी त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनीही शिंदे यांच्यासोबतच्या प्रशासकीय व वैयक्तिक आठवणींना उजाळा देत, अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधत कामे प्रभावीपणे पूर्ण करण्याची त्यांची क्षमता उल्लेखनीय असल्याचे नमूद केले.
आपल्या मनोगतात रवींद्र शिंदे यांनी ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळाचा शांत आणि संयत आढावा घेतला. विविध पदांवर काम करताना आलेले अनुभव, आव्हाने आणि त्यावर मात करताना जपलेली शिस्त, पारदर्शकता व जबाबदारी यांचा त्यांनी उल्लेख केला. “अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच अनेक उपक्रम यशस्वी झाले,” असे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच आपल्या आयुष्यातील यशामागे आई-वडिलांची मोलाची साथ असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी मुलगा तन्मय शिंदे यांनी अमेरिकेतून व्हिडिओद्वारे भावना व्यक्त करत वडिलांविषयीचा अभिमान व्यक्त केला, तर मुलगी हर्षाली शिंदे तसेच जिल्हा परिषद सदस्य भावना विचारे यांनी शिंदे यांच्या कर्तव्यनिष्ठा, साधेपणा, कुटुंबवत्सलता आणि माणुसकीचा भावपूर्ण उल्लेख केला. कार्यक्रमात रवींद्र शिंदे यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा घेणारी विशेष चित्रफीत सादर करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आणि योजनांचा प्रभावी आढावा या चित्रफितीतून मांडण्यात आला.
भावनिक वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्यात उपस्थितांनी रवींद्र शिंदे यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधान लाभावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
