वाढवण बंदर प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा; उच्चस्तरीय बैठकीत आराखडा निश्चित

मुंबई, दि. १८ एप्रिल २०२६ : वाढवण पोर्ट प्रकल्प लिमिटेड (व्हीपीपीएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. गौरव दयाल (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली वाढवण बंदर प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. भारतातील १३वे प्रमुख बंदर ठरणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीत प्रकल्पाशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल विचारविनिमय झाला. विशेषतः बंदराशी जोडणाऱ्या रस्ते पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेल्या जमीन संपादन प्रक्रियेला गती देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. बंदराच्या कार्यक्षमतेसाठी अखंड व सुलभ जोडणी अत्यावश्यक असल्याने संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले.

मत्स्य व्यवसायाशी संबंधित मुद्द्यांवरही बैठकीत विशेष चर्चा झाली. स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेचे संरक्षण करताना प्रकल्पाची अंमलबजावणी सुरळीतपणे पार पडावी, यासाठी संतुलित धोरण अवलंबण्याचे महत्त्व अध्यक्षांनी अधोरेखित केले. विकासासोबत सामाजिक जबाबदारीही पार पाडली जावी, यावर भर देण्यात आला.

यावेळी स्थानिक युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘वाढवण पोर्ट कौशल्य विकास कार्यक्रमाचा’ आढावाही घेण्यात आला. या उपक्रमाद्वारे परिसरातील तरुणांना उद्योगसुसंगत कौशल्ये प्रदान करून रोजगाराच्या संधी वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

बैठकीस पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखर (भा.प्र.से.), मत्स्य आयुक्त सुश्री प्रेरणा देशभरतर (भा.प्र.से.) तसेच व्हीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जेएनपीएचे उपाध्यक्ष रविश कुमार सिंह (भा.रे.वा.से.) उपस्थित होते. याशिवाय केंद्र व राज्य शासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, बंदर प्रशासन, जिल्हा प्रशासन, वन व मत्स्य विभाग, तसेच एनएचएआय, भारतीय रेल्वे, तांत्रिक सल्लागार व कौशल्य विकास संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

अध्यक्षांनी सर्व संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय राखण्यावर भर देत प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा वेग कायम ठेवण्यासाठी परस्पर सहकार्याने कार्य करण्याच्या सूचना दिल्या.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button