संस्कारांचा वारसा आणि जनसेवेची परंपरा…! अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे साहेब यांची भावस्पर्शी कहाणी

बार्शीतील सुलाखे हायस्कूलमध्ये शिक्षण सुरू झालं आणि तिथेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळू लागला. शिस्त, कष्ट आणि आत्मविश्वास यांच्या बळावर त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. पुढे शिवाजी महाविद्यालयात शिक्षण घेताना रवींद्र शिंदे साहेब यांनी आयुष्याची दिशा ठरवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.


वैद्यकीय शिक्षणासाठी केवळ दोन गुण कमी पडले-हा प्रसंग अनेकांना खचवणारा ठरला असता. पण शिंदे यांनी त्याला अपयश मानलं नाही; उलट तो एक नवा मार्ग शोधण्याचा संकेत मानला. 1985 साली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे प्रवेश घेत त्यांनी कृषी क्षेत्रात स्वतःला झोकून दिलं. 1989 साली B.Sc. (Agri.) प्राविण्यासह पूर्ण करताना आणि पुढे M.Sc. (Agri.) सुवर्णपदक मिळवताना त्यांनी सिद्ध केलं की, मार्ग बदलला तरी ध्येयाची उंची कमी होत नाही. यानंतर श्री. शिंदे साहेब यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला. 1990 साली पूर्व परीक्षा, 1991 साली मुख्य परीक्षा आणि 1992 साली उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड, हा त्यांच्या कष्टांचा आणि चिकाटीचा परिपाक होता. लांजा (जि. रत्नागिरी) येथे कृषी विभागात कार्य करताना त्यांनी प्रशासनाची प्राथमिक शिदोरी मिळवली. त्यांचा प्रवास म्हणजे सातत्याने जबाबदार्‍या वाढत जाण्याचा आणि त्या समर्थपणे पेलण्याचा प्रवास. गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, उपायुक्त, अतिरिक्त संचालक आणि शेवटी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रत्येक पदावर त्यांनी केवळ काम केलं नाही, तर ठसा उमटवला.

जवळपास 34 वर्षे 8 महिन्यांचा हा प्रवास म्हणजे समर्पणाचा इतिहासच आहे. त्यांच्या आयुष्यावर कुटुंबीयांचा प्रभावही तितकाच खोल आहे. आजोबा कृष्णाजी शिंदे यांची दूरदृष्टी आणि कष्टाळूपणा, वडील उद्धवराव शिंदे यांचं नेतृत्व आणि गावविकासासाठी केलेलं योगदान. या सर्वांनी त्यांच्या मनात समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली. 250 एकर शेती असूनही गावकर्‍यांना रोजगार मिळावा म्हणून आजोबांनी विहिरी बांधल्या, तर वडिलांनी 20 वर्षे सरपंच म्हणून गावात रस्ते, वीज, पाणी, शिक्षण आणि रोजगाराच्या सुविधा निर्माण केल्या. हा वारसा शिंदे यांच्या रक्तातच होता.त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक जबाबदार्‍या सांभाळल्या, पण प्रत्येक ठिकाणी त्यांनी माणुसकी जपली. त्यांच्या निर्णयांमध्ये केवळ नियम नव्हते, तर संवेदनशीलता होती. प्रत्येक योजना त्यांनी कागदावरून उतरवून प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. आज ते सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या मागे केवळ फाईल्स आणि आकडे उरत नाहीत, तर उरतात ती हजारो कुटुंबांचे आशीर्वाद, बदललेली आयुष्यं आणि घडवलेला विश्वास!


रवींद्र उद्धवराव शिंदे साहेब यांचा प्रवास आपल्याला एकच गोष्ट शिकवतो. रवींद्र शिंदे साहेब यांचे आयुष्य समजून घ्यायचे असेल, तर त्यांच्या कुटुंबाकडे पाहावे लागेल. 1977 ते 1997 या वीस वर्षांच्या काळात त्यांचे वडील उद्धवराव शिंदे यांनी सरपंच म्हणून गावाची जबाबदारी सांभाळली. त्या काळात ‘सरपंच’ हा शब्द केवळ पद नव्हता, तर तो विश्वासाचा केंद्रबिंदू होता. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी जे उपक्रम राबवले, ते आजही आदर्श मानले जातात. गावात रोजगार निर्माण व्हावा म्हणून खडी केंद्र सुरू करणे, रस्ते बांधून दळणवळण सुधारणा करणे, कुटुंब कल्याण कार्यक्रम राबवणे, वीजपुरवठा व स्ट्रीट लाईटची व्यवस्था करणे, अगदी बस सेवा सुरू करून गावाला शहराशी जोडणे, ही कामे त्या काळात क्रांतिकारकच होती. खठऊझ आणि इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून त्यांनी गरिबांच्या आयुष्यात आशेचा दिवा लावला. टेलिफोन आणि झउज बूथ सुरू करून त्यांनी गावाला आधुनिकतेची जोड दिली.


फक्त पायाभूत सुविधा नव्हे, तर सामाजिक उन्नतीवरही त्यांचा भर होता. दूध सहकारी संस्था आणि शिक्षण संस्था उभारून त्यांनी गावाच्या भविष्याला दिशा दिली. त्या शिक्षण संस्थेमुळे जवळपास 500 जणांना शासकीय नोकर्‍या मिळाल्या, तर काही विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले. अशा वातावरणात वाढलेले रवींद्र शिंदे यांच्यात समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव नैसर्गिकपणे निर्माण झाली. आईकडूनही त्यांना विद्वत्तेचा आणि संस्कारांचा वारसा लाभला. आईचे वडील न्यायाधीश, तर मामा प्राध्यापक. म्हणून घरात शिक्षण आणि शिस्त यांचे महत्त्व रुजलेले होते. बार्शी येथे शिक्षणाची संधी मिळाली आणि आजीच्या मायेने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला भावनिक बळ दिले. आईपेक्षा जास्त माया करणारी आजी ही त्यांच्या आयुष्यातील एक मोठी ताकद ठरली. शासकीय सेवेत आल्यानंतर त्यांनी या सर्व संस्कारांना कृतीत उतरवले. 1994-95 मध्ये गंगापूर येथे गटविकास अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी दारिद्र्य निर्मूलनाला नवी दिशा दिली. खठऊझ योजनेच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळवून दिला.

आश्वासित रोजगार योजनेतून शाळा आणि अंगणवाडी बांधकामे करून त्यांनी भविष्यातील पिढ्यांसाठी भक्कम पायाभरणी केली. जालना येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी अनुकंपा तत्त्वावर जवळपास 200 कर्मचार्‍यांच्या पाल्यांना नोकर्‍या दिल्या. ही केवळ नियुक्ती नव्हती, तर 200 कुटुंबांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण होता. न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसेस निकाली काढून त्यांनी पारदर्शकतेचा आदर्श ठेवला. सोलापूरमध्ये कुपोषण निर्मूलनाच्या लढ्यात त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. दोन हजार कुपोषित मुलांची संख्या कमी करून दोनशेवर आणणे म्हणजे केवळ आकडे कमी करणे नव्हे, तर अनेक बालजीवनांना नवा श्वास देणे होते. 2006 मध्ये सांगली येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेला खडज मानांकन मिळवून दिले. गुणवत्तेचा एक नवा मापदंड प्रस्थापित केला. ठाणे येथे कार्यरत असताना यशवंत पंचायत राज अभियानात सलग दोन वर्षे राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवून देणे, हे त्यांच्या कार्यक्षमतेचे द्योतक आहे.


कोकण भवन येथे त्यांनी राज्यस्तरीय कार्यक्रमांचे उत्कृष्ट आयोजन केले, तर उमेद अभियानात त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठे काम केले. अडीच लाख बचत गट, 25 लाख महिला आणि हजारो कोटींचे भांडवल. या सर्वांमधून त्यांनी महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा दिली. ज्यांनी कधी विमान पाहिले नव्हते, त्या महिलांना अमेरिकेपर्यंत घेऊन जाणे, त्यांच्या उत्पादनांची डॉलरमध्ये विक्री होताना पाहणे, हा क्षण त्यांच्या कार्याचा खरा पुरस्कार होता. आज ते सेवानिवृत्त होत असले, तरी त्यांनी घडवलेले बदल, उभारलेली माणसे आणि दिलेला आत्मविश्वास-हे सर्व कायम जिवंत राहणार आहे.
रवींद्र उद्धवराव शिंदे साहेब यांचा शासकीय प्रवास म्हणजे केवळ पदांची शृंखला नाही, तर प्रत्येक टप्प्यावर समाजाशी नाळ जपणार्‍या एका संवेदनशील अधिकार्‍याची कथा आहे. त्यांच्या सेवेतला प्रत्येक कालखंड हा एखाद्या वेगळ्या जबाबदारीचा आणि त्यातून उभ्या राहिलेल्या परिणामांचा साक्षीदार ठरतो. जिल्हा परिषद, नाशिक येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना देशावर कोविडचे मोठे संकट कोसळले होते. भीती, अनिश्चितता आणि असहाय्यता या सगळ्या भावना समाजात दाटून आल्या होत्या. अशा काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम केवळ एक योजना नव्हती, तर ती जनजागृतीची, जबाबदारीची आणि एकजुटीची चळवळ होती. या मोहिमेच्या जिल्हास्तरीय सनियंत्रणाची जबाबदारी शिंदे साहेब यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडली. विशेषतः मालेगावसारख्या संवेदनशील शहरात सनियंत्रण अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्या काळात घेतलेले निर्णय, केलेली धडपड आणि दाखवलेले नेतृत्व हे त्यांच्या कार्यक्षमतेचे जिवंत उदाहरण आहे. यानंतर राज्यस्तरावर प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन म्हणून त्यांनी काम केले. ग्रामीण महाराष्ट्राच्या जीवनमानाशी थेट जोडलेल्या या योजनेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदांच्या विविध योजनांना एकत्रित करून एक सुसंगत कृती आराखडा तयार करणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण त्यांनी ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडत राज्यातील ग्रामीण भागासाठी पाण्याचे नियोजन अधिक परिणामकारक केले. त्यांच्या या कामामुळे अनेक गावांमध्ये ‘नळातून पाणी’ ही केवळ कल्पना न राहता वास्तव बनण्याचा मार्ग मोकळा झाला. ऑगस्ट 2022 पासून जिल्हा परिषद, पालघर येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि येथे त्यांच्या कामाचा खरा प्रभाव दिसून आला. साडेतीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी केवळ योजना राबवल्या नाहीत, तर त्या लोकांच्या जीवनात कशा बदल घडवू शकतात, हे दाखवून दिले. कृषी विभागांतर्गत बिरसा मुंडा योजनेच्या माध्यमातून जवळपास 2000 आदिवासी बांधवांना विहिरींचा लाभ मिळवून देणे, हा त्यांच्या कार्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग ठरला. या उपक्रमामुळे केवळ पाणी उपलब्ध झाले नाही, तर त्या शेतकर्‍यांच्या आयुष्याची दिशा बदलली. ज्यांचे वार्षिक उत्पन्न पन्नास हजारांच्या आसपास होते, तेच उत्पन्न आता लाखोंच्या घरात पोहोचले. स्थलांतर थांबले, मजुरीवर अवलंबित्व कमी झाले आणि त्यांच्या मुलांना शिक्षणाची नवी संधी मिळाली. हा बदल केवळ आकड्यांमध्ये मोजता येत नाही, तर तो आयुष्य बदलणारा होता.

पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा त्यांनी घेतलेला ध्यासही तितकाच महत्त्वाचा ठरला. जवळपास 140 न जोडलेल्या रस्त्यांपैकी 100 पाड्यांना बारमाही रस्त्यांनी जोडणे, ही एक मोठी कामगिरी आहे. उर्वरित रस्त्यांचे कामही प्रगतीपथावर आहे. या रस्त्यांमुळे केवळ दळणवळण सुधारले नाही, तर शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधीही त्या भागात पोहोचल्या. त्यांनी प्रशासनात पारदर्शकता आणण्यावर विशेष भर दिला. जिल्हा परिषदेच्या काम वाटप समितीमध्ये पारदर्शकता निर्माण करून कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी त्यांनी काटेकोर सनियंत्रण केले. यामुळे प्रशासनावरचा लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला. प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) या पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळताना त्यांनी 2017 पासून अपूर्ण असलेली 3000 घरकुले पूर्ण करून अनेक कुटुंबांना सुरक्षित निवार्‍याचा हक्क मिळवून दिला. ग्रामसेवकांच्या बैठका घेऊन, नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम पूर्ण करणे, ही त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख आहे. त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या-जालना येथे 200 कुटुंबांना नोकरीची संधी, सोलापूरमध्ये कुपोषण निर्मूलन, सांगली येथे खडज मानांकन, ठाण्यात पंचायत राज अभियानात प्रथम क्रमांक, आणि उमेद अभियानातून लाखो महिलांना आर्थिक बळकटी-ही सर्व त्यांच्या कार्याची साक्ष देणारी उदाहरणे आहेत.

आज ते सेवानिवृत्त होत असताना, त्यांनी घडवलेले बदल, उभारलेली व्यवस्था आणि दिलेला आत्मविश्वास हीच त्यांची खरी ओळख आहे. रवींद्र उद्धवराव शिंदे-एक अधिकारी, ज्यांनी केवळ काम केले नाही, तर लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणला. रवींद्र उद्धवराव शिंदे साहेब एक अधिकारी नव्हे, तर संस्कार, संघर्ष आणि समर्पण यांचे जिवंत उदाहरण! परिस्थिती कितीही कठीण असो, जिद्द, प्रामाणिकपणा आणि कष्ट यांच्या बळावर कोणतंही स्वप्न साकार करता येतं. 31 मार्च 2026 एक तारीख, पण अनेकांच्या मनात घर करणार्‍या व्यक्तिमत्त्वाच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

  • डॉ. प्रकाश हसनाळकर (पशुसंवर्धन अधिकारी, पालघर, लेखक ज्येष्ठ कवी असून ते चारोळीकार आहेत.)
Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button