छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानामध्ये 1 हजार 283 सेवांचे वितरण

पालघर, दि. 10 एप्रिल : महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामे जलदगतीने निकाली काढून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा-1)” अंतर्गत बोईसर मंडळातील डॉ. स. द. वर्तक विद्यालय, विद्यानगर (खैरेपाडा) येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा शुभारंभ अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे यांच्या हस्ते झाला.

या शिबिरामधून एकूण 1 हजार 283 सेवा व दाखले वितरित करण्यात आले.यावेळी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) तेजस चव्हाण, अप्पर तहसीलदार (अकृषिक) तुषार शिंदे, स्थानिक सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच तसेच बोईसर परिसरातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते.

शिबिरामध्ये नागरिकांना 7/12 व 8अ उतारे वाटप, अभिलेख अद्ययावत करणे, घरकुल पट्टे वितरण, ई-मोजणी, पाणंद रस्ते, फेरफार प्रकरणे निकाली काढणे, तुकडेबंदी कायद्याबाबत मार्गदर्शन, पीएम किसान योजना, सामाजिक योजनांचा लाभ अशा विविध सेवा “सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी” अंतर्गत देण्यात आल्या. याशिवाय आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, ई-केवायसी, मतदार नोंदणी व वगळणी तसेच आरोग्य तपासणी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या.

विशेष म्हणजे, वाढवण बंदर (ग्रीनफिल्ड महामार्ग) प्रकल्पासाठी शिगांव, गारगांव, राणिशिगांव, नेवाळे व खुताड येथील भूसंपादन प्रकरणांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला होता. या कक्षाद्वारे जमीन अभिलेख अद्ययावत करून भूसंपादन मोबदला वाटप प्रक्रिया सुलभ करण्यावर भर देण्यात आला.तसेच मृत्यू नोंद नसलेल्या प्रकरणांमध्ये वारसनोंद सुलभ करण्यासाठी ग्रामसेवकांकडून आवश्यक दाखले उपलब्ध करून देण्याची आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याची यंत्रणाही उभारण्यात आली.

या सोबतच पंचायत समिती, समाजकल्याण, पशुसंवर्धन, जिल्हा उद्योग केंद्र व आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. उद्योजकतेसाठी मार्गदर्शन तसेच लक्ष्मीमुक्ती योजना, कलम 85 अर्ज आदी विषयांवरही नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button