“वीर सुपुत्राचे विळंगी गावात जल्लोषात स्वागत; मिलिंद पाटील यांच्या आगमनाने भावूक”

पालघर : विळंगी गावाने आपल्या मातृभूमीसाठी दोन दशके निस्वार्थ सेवा करणाऱ्या वीर सुपुत्राचे अर्थात मिलिंद प्रभाकर पाटीलयांचे अभूतपूर्व आणि भावनिक स्वागत करत देशभक्तीचा अनोखा सोहळा साजरा केला. तब्बल वीस वर्षांच्या अखंड सेवेनंतर भारतीय सैन्यातून निवृत्त होऊन गावात परतलेल्या या जवानाचे आगमन गावकऱ्यांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला.

मिलिंद पाटील हे सौ. शैला व श्री. प्रभाकर पांडुरंग पाटील यांचे ज्येष्ठ सुपुत्र असून, 2006 साली त्यांनी सैन्यात दाखल होऊन उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, राजस्थान, आसाम, उत्तर प्रदेश अशा विविध संवेदनशील भागांत कर्तव्य बजावत देशसेवा केली. काश्मीरमधील दहशतवादी गोळीबाराला सामोरे जाणे, तसेच सुट्टीदरम्यान झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातून बचावणे, अशा थरारक प्रसंगांना त्यांनी धैर्याने तोंड दिले. त्यांच्या या शौर्यपूर्ण सेवेसाठी त्यांना विविध पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

मंगळवार, ७ एप्रिल २०२६ रोजी त्यांच्या आगमनानिमित्त गावात जल्लोषाचे वातावरण होते. सफाळे स्टेशनपासून विळंगी गावापर्यंत युवकांनी भव्य बाईक रॅली काढत त्यांचे स्वागत केले. कै. निखिल राजन घरत सभागृहात आयोजित सत्कार सोहळ्यात ग्रामस्थ, नातेवाईक, मान्यवर आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.“भारत माता की जय” च्या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात या वीर सुपुत्राचा सन्मान करण्यात आला. गावातील एकजूट आणि प्रेम पाहून मिलिंद पाटील यांना गहिवरून आले. त्यांनी नम्रपणे सर्वांचे आभार मानत, “मी आयुष्यभर गावकऱ्यांच्या ऋणात राहीन,” असे भावुक उद्गार काढले. या कार्यक्रमाने केवळ एका जवानाचा सन्मानच नव्हे, तर देशसेवेप्रती असलेला आदर आणि गावकऱ्यांची एकजूट अधोरेखित केली.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button