प्रशासनाच्या आश्वासनानंतर घोणसई ग्रामस्थांचे उपोषण मागे बांधकाम बंद ठेवण्याचे दिले आश्वासन

वाडा : रुपेश मोकाशी

घोणसई गाव लोकवस्ती लगत ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट इम्पेक्स लिमिटेड या कंपनीने लोखंड कारखान्याचे बांधकाम सुरू केले असून या कारखान्यामुळे ध्वनी व वायू प्रदूषण, अरूंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी अपघात कंपनीला लाखो लिटर पाणी लागणार असल्याने पाण्याची टंचाई जाणवणार असल्याने ग्रामस्थांनी या कारखान्याला विरोध दर्शवला असून प्रदूषणकारी कारखाना लोकवस्ती लगत नको या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार 3 तारखेपासून बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते.

या आंदोलनाची प्रशासनाने घेऊन कंपनीचे काम बंद ठेवण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. तालुक्यातील घोणसई या गावात लोकवस्ती लगत ‘ ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट इम्पेक्स लिमिटेड ‘ या कंपनीने लोखंड कारखान्याचे बांधकाम सुरू केले आहे.

या कारखान्यात आय बीम, टोर, सळया, एंगल्स, पाईप आदींचे उत्पादन करण्यात येणार असून प्रति दिन 800 टन लोखंडाचे उत्पादन करण्यात येणार आहे.हा कारखाना लोकवस्ती लगत होत असल्यामुळे कारखान्यामुळे ध्वनी व वायू प्रदूषण होणार असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. तसेच या गावात जाणारा मुख्य रस्ता हा अंत्यत अरूंद असल्याने कंपनीची कच्चा माल घेऊन येणारी व पक्का माल घेऊन जाणारी अवजड वाहने या रस्त्यावरून ये जा करणार असल्याने वाहतूक कोंडी व अपघात ही नित्याचीच डोकेदुखी होऊन बसणार आहे. अपघातामुळे निष्षाप नागरिकांचा नाहक बळी जाणार आहे. प्रति दिन 800 टन लोखंडाचे उत्पादन करायला दररोज लाखो लिटर पाण्याची गरज असल्याने अगोदरच गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य त्यातच हा नवा भार पडणार असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे.

कंपनीच्या जागेतून 220 केव्ही तारापूर कुडूस बोरीवली व बोईसर कुडूस घोडबंदर ही अति उच्च दाब बहु परिपथ वाहिनी गेली असून कंपनीत लोखंडाचे उत्पादन केले जाणार असून दुदैवाने कारखान्यात एखादा स्फोट झाल्यास त्याचा धक्का उच्च दाबाच्या वाहिनीला लागल्यास मोठ्या प्रमाणात कामगार व नागरिकांची जीवितहानी होण्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यामुळे प्रदूषणकारी कारखाना लोकवस्तीजवळ नको म्हणून ग्रामस्थांनी याला विरोध दर्शवला आहे.

प्रदूषणकारी कारखाना लोकवस्ती जवळ नको म्हणून ग्रामस्थांनी विरोधाचा ठराव एकमताने ग्रामसभेत मंजूर केला असून त्याबातचा पत्रव्यवहार जिल्हाधिकारी, सहायक संचालक नगर रचना विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवला आहे.

असे असतानाही कारखान्याचे बांधकाम सुरू केल्याने संतापलेल्या नागरिकांनी बुधवारपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची तहसीलदार भाऊसाहेब अंधारे व उपविभागीय पोलीस अधिकारी एस. एस. मेहेर यांनी दखल घेतली. त्यांनी बुधवारी सायंकाळी (दि.3) शिष्टमंडळासोबत चर्चा केली. मात्र सदरची चर्चा निष्पळ ठरली. त्यानंतर गुरुवारी सकाळी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी आंदोलकांशी चर्चा करून कंपनीचे सुरू असलेले बांधकाम बंद केले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर मेटचे मंडळ अधिकारी हेमंत आक्रेकर यांना उपोषण स्थळी पाठवून काम बंदचे आश्वासन दिले असल्याचे उपोषण कर्त्यांना सांगितल्याने उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषणाला काँग्रेसचे नेते प्रफुल पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गोविंद पाटील, जिजाऊचे परेश पाटील, भाजपचे डाॅ. गिरीश चौधरी, शिवसेनेचे वाडा तालुका प्रमुख निलेश पाटील, मनसेचे दिपक ठाकरे यांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शवला होता. उपोषण मेटचे मंडळ अधिकारी हेमंत आक्रेकर यांच्या हस्ते सोडविण्यात आले.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button