खोटले येथील सौ. सुहासिनी श्रीधर परब हायस्कूलची श्रुती राणे विद्यालयात पहिली

वैष्णवी नाईक द्वितीय, तर कांचन घोगळे व न्हानू आंगणे दोघांना तृतीय क्रमांक विभागून

कसाल : राजतंत्र वृत्तसेवा

मालवण तालुक्यातील खोटले येथील कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था, कसाल संचलित सौ. सुहासिनी श्रीधर परब हायस्कूलने फेब्रुवारी २०२६ च्या एस.एस.सी. परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल ८९.४७ टक्के लागला असून विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या परीक्षेस शाळेतील एकूण १९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांच्या मार्गदर्शनाची जोड मिळाल्याने हे यश संपादन झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

गुणानुक्रमात कु. श्रुती शिरीषकुमार राणे हिने ५०० पैकी ४४९ गुण मिळवत ८९.८० टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकावला. कु. वैष्णवी महेश नाईक हिने ३९९ गुणांसह ७९.८० टक्के मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच कु. कांचन प्रकाश घोगळे व कु. न्हानू सत्यवान आंगणे यांनी प्रत्येकी ३६२ गुण मिळवत ७२.४० टक्क्यांसह संयुक्त तृतीय क्रमांक मिळवला.विशेष बाब म्हणजे प्रथम क्रमांक मिळवणारी कु. श्रुती राणे हिच्यासह अन्य चार विद्यार्थी वायंगवडे गावातील असून या सर्वांच्या यशाबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम व जिद्दीच्या बळावर मिळवलेले हे यश प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त होत आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अवधुत मालणकर, सचिव आशिष परब, संस्थेचे विश्वस्त, शाळा समितीचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक वाघमारे टी. आर., शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मित्रत्व, शिक्षण आणि संस्कार यांचे सुंदर नाते पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले, जेव्हा संस्थेचे सचिव आशिष परब यांनी आपल्या वर्गमित्र शिरीषकुमार राणे यांच्या कन्या कु. श्रुती राणे हिच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला. लहानपणी एकाच वर्गात बसून स्वप्ने पाहणारे दोन मित्र… आणि आज त्यातील एका मित्राची मुलगी शाळेत प्रथम क्रमांक मिळवून गावाचे नाव उज्ज्वल करते, ही क्षणाची आनंददायी आणि अभिमानास्पद भावना होती. कु. श्रुती राणे हिने आपल्या मेहनत, जिद्द आणि अभ्यासाच्या जोरावर संस्था तसेच पंचक्रोशीतील सर्व गावात मिळून असा प्रथम क्रमांक मिळवून सर्वांचा मान उंचावला. यावेळी सचिव आशिष परब यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “मित्राच्या मुलीच्या यशात स्वतःच्या घरातील आनंद अनुभवणे, हीच खरी नाती जपणारी संस्कृती आहे,” अशा भावना यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आल्या. काही परंपरा या केवळ घराण्याच्या नसतात, त्या संस्कारांच्या वारशातून घडत असतात. खोटले येथील सौ. सुहासिनी श्रीधर परब हायस्कूलमध्ये कु. श्रुती राणे हिने प्रथम क्रमांक मिळवत राणे कुटुंबाची गौरवशाली शैक्षणिक परंपरा पुन्हा उजळवली आहे. विशेष म्हणजे तिचे वडील शिरीषकुमार राणे हेही याच विद्यालयाचे तत्कालीन गुणवंत विद्यार्थी होते. श्रुतीची मोठी बहीण श्रेया हिनेही विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला होता, तर तिचे चुलत बंधू देखील याच शाळेचे टॉपर राहिले आहेत.

आदर्श शिक्षक, चित्रकार, गणेशमूर्तीकार कै. अनंत शिवाजी राणे आणि कै. वसंत शिवाजी राणे यांच्या संस्कारांची ही यशस्वी नातवंडे आज शिक्षणाचा प्रेरणादायी वारसा जपत आहेत, अशा प्रतिक्रिया समाजातून व्यक्त होत आहेत.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button