पालघर : रोटरी क्लब ऑफ उमरोळीचा रोटरी वर्ष २०२६-२७ साठीचा पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. डिस्ट्रिक्ट ३१४१ चे गव्हर्नर रोटेरियन राजन दुआ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजन दुआ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत रोटरी ही केवळ संस्था नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे हीच खरी रोटरी सेवा असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी रोटेरियन प्रभाकर पाटील यांनी रोटरी क्लब ऑफ उमरोळीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
“Create Lasting Impact” या रोटरीच्या यंदाच्या संकल्पनेनुसार समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तसेच क्लबच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि युवक विकास क्षेत्रात अधिक प्रभावी काम करण्याचा मानस त्यांनी मांडला.
सोहळ्यात नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण विधीही पार पडला. सचिव, खजिनदार आणि संचालक मंडळातील सदस्यांनी आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी आगामी वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा प्रकल्पांची घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमाला असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन पदम शर्मा, रोटेरियन देवांग गरोडिया, गेमोड पंतकी यांच्यासह विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष, सदस्य, उमरोळी परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजन दुआ यांनी मागील वर्षभरात क्लबने केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याचे कौतुक करत नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. समाजसेवेची परंपरा अधिक बळकट करण्यासाठी सर्व सदस्यांनी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्नेहभोजन आणि परस्पर संवादाने कार्यक्रमाची सांगता झाली. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला हा पदग्रहण सोहळा उमरोळी परिसरासाठी संस्मरणीय ठरला.
