सौर ऊर्जेमुळे गुहिर गावाचा कायापालट होणार : सचिन तेंडूलकर

वाडा : रुपेश मोकाशी

सर्वांना सन्मानाने जगण्याचा तसेच आयुष्यात संधी देऊन, उत्तम जीवन जगण्यास सक्षम करून समाजात हास्य फुलवण्याच्या हेतूने SHIF ची निर्मिती असून गुहीरला भेट देताना, केवळ तंत्रज्ञानच नव्हे, तर ज्या प्रकारे समाजाने ही यंत्रणा स्वीकारली आहे, ते प्रकर्षाने जाणवेल. शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे, महिलांनी कृषी-प्रक्रिया उपक्रमांचे नेतृत्व करणे तसेच विद्युतीकरण झालेल्या शाळांमुळे मुलांना शिक्षणाची उत्तम संधी मिळणे, हे खऱ्या अर्थाने विकासाचे सर्वसमावेशक प्रारूप आहे. ते केवळ या पर्यायांचा वापर करत नाहीत, तर ते गावाचे भविष्य घडवत आहेत. “गुहिरमध्ये तंत्रज्ञानासोबतच लोकसहभागातून विकास साधला जात आहे. महिलांचे नेतृत्व, शेतकऱ्यांची प्रगती आणि मुलांच्या शिक्षणातील सुधारणा हे या उपक्रमाचे खरे यश आहे,” असे प्रतिपादन क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी केले. वाडा तालुक्यातील गुहीर गावामध्ये सचिन तेंडुलकर आणि श्नाइडर इलेक्ट्रिक इंडिया यांच्या पुढाकारातून ‘स्प्रेडिंग हॅपिनेस इंडिया फाउंडेशन’ (SHIF) मार्फत गावामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पामुळे या गावाचा सर्वांगीण कायापालट करण्यात होणार आहे. या गावातील शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. या उपक्रमांतर्गत 40 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून, तो IoT-सक्षम स्मार्ट पॉवर मॅनेजमेंट सिस्टीमशी जोडलेला आहे. या प्रणालीमुळे गावात वीजपुरवठा होत असून सिंचन पंप, भात मळणी, तांदूळ गिरणी तसेच मसाला प्रक्रिया हे सर्व युनिट्स सुरळीतपणे कार्यरत होतील.

या गावातील 113 कुटुंबांना वीजपुरवठा, 25 पथदिवे तसेच अंगणवाडीचे विद्युतीकरण करून 30 हून अधिक बालकांना याचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पामुळे कृषी उत्पादनात वाढ होणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्नही सुधारणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, महिलांच्या नेतृत्वाखालील शेतकरी उत्पादक संघटनेमार्फत (FPO) कृषी-प्रक्रिया उद्योग चालवले जात आहेत. त्यामुळे महिलांचे सशक्तीकरण होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळाले . “स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान आणि योग्य भागीदारी यामुळे सामाजिक परिवर्तन घडू शकते, याचे गुहिर गाव हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे ”श्नाइडर इलेक्ट्रिक इंडियाचे झोन प्रेसिडेंट – ग्रेटर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक शर्मा यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या उपक्रमाला बायफ या संस्थेचे विशेष सहकार्याने व मार्गदर्शन लाभल्याने सौर ऊर्जेच्या वापरामुळे शेतीचे सिंचन क्षेत्र वाढले असून, पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी झाले आहे. गावच्या सरपंच सरीता गायककर यांनी सांगितले की, “सौर प्रकल्पामुळे शेती आणि प्रक्रिया उद्योगांना सातत्याने वीज मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा फायदा झाला आहे. ”दरम्यान, गुहिर गावाचा हा विकास मॉडेल ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी ठरत असून, स्वच्छ ऊर्जा आणि सामुदायिक सहभागाच्या जोरावर शाश्वत विकास साधता येतो, हे या प्रकल्पातून स्पष्ट झाले आहे. यावेळी परिसरातून हजारो नागरिक या कार्यक्रमासाठी हजर होते.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button