राष्ट्रपतींच्या उपस्थितीत जव्हार आयटीडीपीला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च सन्मान

पालघर, दि. ४ जून २०२६ : राजतंत्र वृत्तसेवा

आदिवासी विकास क्षेत्रात उल्लेखनीय व परिणामकारक कार्य केल्याबद्दल जव्हार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) याला केंद्र सरकारच्या जनजाती कार्य मंत्रालयातर्फे “सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प” हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासोबत पाच लाख रुपयांचा धनादेश देऊन प्रकल्पाचा गौरव करण्यात आला.

“आयटीडीए आणि आयटीडीपीचे बळकटीकरण” या विषयावर आयोजित राष्ट्रीय संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संमेलनाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी जनजाती कार्य मंत्रालयाच्या सचिव रंजना चोप्रा, अप्पर सचिव मनीष ठाकूर, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक लाहिरी यांच्यासह विविध राज्यांतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी मच्छिंद्र गडाख आणि नियोजन अधिकारी सतीश रास्ते यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजना, प्रभावी अंमलबजावणी, लाभार्थी-केंद्रित उपक्रम तसेच उत्कृष्ट प्रशासकीय कार्यपद्धतीची दखल घेत जव्हार आयटीडीपीला हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला. या यशामुळे पालघर जिल्ह्यासह राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button