सफाळे : राजतंत्र वृत्तसेवा
पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील विधीश जयेश राऊत याने पहिल्या जागतिक योगसाधना स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील यशानंतर आता जागतिक स्तरावरही चमकदार कामगिरी करत त्याने पालघरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे.

गुजरातमधील अहमदाबाद येथील ट्रान्स स्टेडिया येथे ४ ते ९ जून २०२६ दरम्यान झालेल्या या स्पर्धेत ७९ देशांनी सहभाग घेतला होता. ग्रुप इव्हेंटच्या अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका यांच्यात रंगलेल्या सामन्यात विधीशने दिलेली दोन कठीण आव्हाने श्रीलंकेच्या स्पर्धकांना पूर्ण करता आली नाहीत. तसेच लेग बॅलन्स प्रकारात श्रीलंका आणि उझबेकिस्तानवर मात करत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली.
डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्था संचालित चंद्रप्रभा चित्तरंजन श्रॉफ इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी असलेला विधीश लहानपणापासून योगसाधनेत रमला. आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सुरुवात केली आणि पुढे व्यावसायिक प्रशिक्षणासाठी दररोज चार स्टेशन दूर जाऊन सराव करत शिक्षण व योगाचा समतोल साधला.
यापूर्वी लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात ट्रॅडिशनल आणि आर्टिस्टिक योगासन या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदके जिंकत त्याने ‘बेस्ट ऑफ द बेस्ट प्लेयर’ किताब मिळवला होता. त्यानंतर संगमनेर येथे झालेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत लेग बॅलन्स प्रकारात सुवर्णपदक जिंकून जागतिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. तसेच आगरतळा येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत ट्रॅडिशनल योगा प्रकारात रौप्यपदकही पटकावले.विधीशच्या यशामागे त्याचे आई-वडील जयेश राऊत व कृपाली राऊत, प्रशिक्षक, शाळेचे शिक्षक, डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्था आणि पालघर जिल्हा योगासन असोसिएशन यांचे मोठे योगदान असल्याची भावना व्यक्त होत आहे.
जागतिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर विधीशचे सफाळे येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सफाळे ग्रामपंचायतीतर्फे त्याची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली, तर डॉ. अमृते शिक्षण संस्थेत त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला. विविध मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून या यशस्वी खेळाडूचे अभिनंदन केले.
विधीशचे सफाळे येथे आगमन झाल्यानंतर त्याची सफाळे ग्रामपंचायतच्या वतीने वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली व डॉ अमृते शिक्षण संस्थेतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, सरपंच तनुजा कवळी, उपसरपंच राजेश म्हात्रे, संस्थेचे संचालक रवी शिवदे, सुचिता पाटील, निवृत्त मुख्याध्यापिका मधुमती कुलकर्णी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, ग्रामस्थ उपस्थित होते.
