पालघर : राजतंत्र वृत्तसेवा
पालघर तालुक्यातील छोट्याशा बिरवाडी गावातून उगवलेला एक तेजस्वी तारा आज संपूर्ण महाराष्ट्राच्या आकाशात झळकताना दिसत आहे. कु. रुद्र गणेश किणी या जिद्दी आणि मेहनती युवकाने राष्ट्रीय पातळीवर 4×400 मीटर रिले खुल्या पुरुष गटात तृतीय क्रमांक मिळवत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशाबद्दल आंतरराष्ट्रीय अॅथलिट व प्रशिक्षक स्नेहल संजय रजपुत (अॅथलेटिक ग्रुप ऑफ पालघर), तसेच खेळाडू मित्र-मैत्रिणी आणि पालक संघ यांनी त्याचे मनापासून अभिनंदन केले आहे.

चाफेकर महाविद्यालय, पालघर येथे इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेत असलेला रुद्र गणेश किणी हा केवळ अभ्यासातच नव्हे, तर क्रीडाक्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करणारा विद्यार्थी आहे. चंदीगड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय खुल्या १६०० मीटर रिले स्पर्धेत त्याने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत तामिळनाडूने प्रथम, पंजाबने द्वितीय तर महाराष्ट्राने तृतीय क्रमांक मिळवला. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरही रुद्रने पाचवा क्रमांक मिळवत आपली क्षमता सिद्ध केली. कठोर सराव, चिकाटी आणि न थकणारी जिद्द याच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे.

रुद्र हा स्नेहल रजपुत यांचा शिष्य असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपली क्रीडा क्षमता अधिक धारदार केली. एका प्रशिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यामध्ये पाहिलेला विश्वास आणि विद्यार्थ्याने प्रशिक्षकावर ठेवलेला विश्वास याचे सुंदर उदाहरण म्हणजे रुद्रचे हे यश होय. त्याचे वडील गणेश किणी हे पालघर जिल्हा ग्रंथालयात कर्मचारी म्हणून कार्यरत असून त्यांनी मुलाच्या प्रत्येक पावलावर त्याला आधार दिला. आई-वडिलांचे संस्कार आणि पाठिंबा यामुळेच रुद्रने हे उंच शिखर गाठले आहे.

पंचमुखी हनुमान मंदिरातसत्कार समारंभात उपस्थित ग्रामस्थ, महिला, लहान मुले
रुद्रच्या या यशाने बिरवाडी गावात अक्षरशः आनंदाचा जल्लोष उसळला. पंचमुखी हनुमान मंदिरात त्याचा सन्मान करण्यात आल्यानंतर गावकऱ्यांनी बॅण्डच्या गजरात आणि जल्लोषात त्याची भव्य मिरवणूक काढली. हनुमान मंदिरापासून त्याच्या घरापर्यंतचा मार्ग जणू अभिमानाच्या फुलांनी सजला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, डोळ्यांत अभिमान आणि हृदयात समाधान होते. “आपला मुलगा देशपातळीवर चमकला” ही भावना प्रत्येक गावकऱ्याच्या मनात दाटून आली होती.
या सन्मान सोहळ्याला बहुजन विकास आघाडीचे पालघर जिल्हा समन्वयक प्रशांत पाटील, नगरसेविका राधा पामाळे, उमरोळीचे सरपंच प्रभाकर पाटील, बिरवाडीचे सरपंच विनोद भावर, पडघेचे सरपंच अनिल हाडळ यांच्यासह ग्रामस्थ, महिला वर्ग आणि तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती. सर्वांनी रुद्रचे कौतुक करत त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव केला.
रुद्र किणीचे हे यश केवळ एक पदक नाही, तर प्रत्येक गावकऱ्याच्या स्वप्नांना नवे पंख देणारी प्रेरणा आहे. “परिस्थिती कितीही साधी असली तरी स्वप्ने मोठी असावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी मनापासून झटावे” हा संदेश रुद्रने आपल्या कर्तृत्वातून दिला आहे. बिरवाडीच्या मातीतून उगवलेला हा हिरा आता देशभर झळकत असून, भविष्यात तो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवेल, असा विश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे.
