पालघर :
पालघर जिल्ह्यातील वीटभट्टी व बांधकाम क्षेत्रात कार्यरत स्थलांतरित कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य सुरक्षेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांचे मार्गदर्शनात व जिल्हा प्रशासन आरोग्य व महिला बालविकास विभाग महसूल विभाग यांच्या समन्वयातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी नियमित आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत पालघर तालुक्यातील चहाडे व कोकणेर येथील वीटभट्टी परिसराला जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) अतुल पारसकर तसेच सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांनी भेट देऊन स्थलांतरित लाभार्थ्यांच्या आरोग्य सेवांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी गरोदर माता, स्तनदा माता तसेच ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना पोषण आहार, पूरक सेवा व आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले. तसेच महा-MTS ॲपवर लाभार्थ्यांची नोंद घेऊन ती अद्ययावत ठेवण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार वास्तव्यास असल्याने त्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १८३ सामुदायिक आरोग्य अधिकारी कार्यरत असून, महिला व बाल विकास विभागामार्फत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांच्या समन्वयातून ही शिबिरे राबविण्यात येत असून, प्रत्येक लाभार्थ्याची तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधोपचारही दिले जात आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष चौधरी व उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत साळुंखे यांचे नियोजनात सदर उपक्रम सुरू आहे. या उपक्रमामुळे स्थलांतरित कुटुंबांच्या आरोग्यस्थितीत सुधारणा होऊन बालकांमधील कुपोषण रोखण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
