पालघर : शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना पालघर जिल्हा (पालघर व डहाणू विधानसभा) पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी कुमार हेमंत माळी यांची पालघर व डहाणू विधानसभा क्षेत्र जिल्हा निरीक्षकपदी निवड केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे युवासेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

युवासेनेत तळागाळातील कार्यकर्ता म्हणून सक्रिय असलेले कुमार माळी यांनी विधानसभा अध्यक्षपदापासून संघटनात्मक कामात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी सातत्याने असलेला संपर्क आणि समाजकार्याची आवड यामुळे पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याचे बोलले जात आहे.
पक्षाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार पालघर व डहाणू विधानसभा क्षेत्रात येत्या १५ दिवसांत नव्याने संघटन बांधणी करणे, सदस्य नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबविणे तसेच मतदार यादी प्रक्रियेबाबत सविस्तर अहवाल युवासेना मध्यवर्ती कार्यालय, ठाणे येथे सादर करण्याची जबाबदारी कुमार माळी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही कुमार माळी सक्रिय आहेत. ते सध्या सोरठी माळी समाजाचे सहसचिव, श्री सोरठी माळी समाज बिगरशेती सहकारी पथसंस्था शिरगावचे उपाध्यक्ष तसेच सोरठी माळी समाज युवा फाउंडेशनचे संस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे युवासेनेला पालघर जिल्ह्यात अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल आमदार राजेंद्र गावित, जिल्हाप्रमुख कुंदन संखे, युवासेना अधिकारी साईराज पाटील, पालघर शहर प्रमुख राहुल घरत, तालुका प्रमुख संजय चौधरी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
युवासेना विधानसभा अध्यक्ष ते जिल्हा निरीक्षकपदी बढती
युवासेना विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रभावी कामगिरी करणारे कुमार माळी यांची आता पालघर व डहाणू विधानसभा क्षेत्राच्या युवासेना जिल्हा निरीक्षकपदी नियुक्ती बढती देऊन करण्यात आली आहे. पक्ष संघटन मजबूत करणे, सदस्य नोंदणी आणि नव्या बांधणीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली असून, त्यांच्या निवडीचे शिवसैनिकांकडून स्वागत होत आहे.
