पालघर : बोईसर पूर्वेकडील मान-वारांगडे परिसरात कार्यरत असलेल्या विराज उद्योगसमूहाच्या कारखान्यांमुळे वाढत चाललेल्या प्रदूषणाविरोधात स्थानिक ग्रामस्थांचा लढा आता अधिक तीव्र झाला आहे. पाणी, हवा आणि जमिनीच्या प्रदूषणामुळे परिसरातील पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर विराज प्रोफाईल कंपनीच्या नियमितीकरण आणि प्रस्तावित विस्तारीकरणाला विरोध करण्यासाठी शुक्रवार ८ मे २०२६ रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
स्थानिकांच्या मते, निसर्गरम्य असलेला मान परिसर औद्योगिक प्रदूषणामुळे दिवसेंदिवस भकास होत चालला आहे. विशेष म्हणजे, या विस्तारीकरणामुळे जिल्ह्यासाठी जीवनदायी मानली जाणारी सूर्या नदी प्रदूषित होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईसह पर्यावरणीय संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून अनेक गावांवर विस्थापनाचे संकट ओढवू शकते, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या विरोधातील लढ्याला आता सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी, प्रतिष्ठित नागरिक आणि चळवळीतील कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
शुक्रवारी धरणे आंदोलनासाठी सकाळी ९.३० वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. “लढेंगे… जितेंगे…!” अशी घोषणा देत पर्यावरण संरक्षणासाठी एकजूट दाखविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
