पालघरमध्ये ‘जागतिक होमिओपॅथी दिन २०२६’ उत्साहात साजरा होणार; MHFDA नव्या कार्यकारिणीची स्थापना

पालघर : राजतंत्र वृत्तसेवा

महाराष्ट्र होमिओपॅथिक फिमेल डॉक्टर्स असोसिएशन (MHFDA), पालघर यांच्या वतीने जागतिक होमिओपॅथी दिन २०२६ निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या सोहळ्यात MHFDA पालघरच्या नव्या कार्यकारिणीचा स्थापना समारंभही पार पडणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता इनर व्हील हॉल, पालघर येथे आयोजित करण्यात आला आहे.


या कार्यक्रमात होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. यासोबतच नव्या नेतृत्वाचे स्वागत करून संघटनेच्या पुढील वाटचालीस नवी दिशा देण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका व माजी नगराध्यक्षा डॉ. उज्वला काळे उपस्थित राहणार आहेत. मान्यवर पाहुणे म्हणून डॉ. पूजा डफळ (राज्यस्तरीय कोअर कमिटी सदस्य), तसेच जायंट्स ग्रुप पालघरचे अध्यक्ष कमल ठाकूर यांची उपस्थिती लाभणार आहे. इनर व्हील क्लब पालघरच्या अध्यक्षा विनिता पाटील यांची सुद्धा विशेष उपस्थिती असणार असून, डॉ. मनीषा शाह या प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.


कार्यक्रमात संस्थापक डॉ. रूपाली गोसावी व सचिव डॉ. आरती नल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये होमिओपॅथी जनकांना श्रद्धांजली, प्रेरणादायी व्याख्यान, सत्कार समारंभ, २०२३-२०२६ कार्यकारिणीचा समारोप आणि २०२६ साठी नव्या कार्यकारिणीची स्थापना यांचा समावेश आहे.


MHFDA पालघरच्या अध्यक्षा डॉ. दक्षता संखे यांच्या नेतृत्वाखाली नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्षा डॉ. सुप्रिया सोनार व डॉ. एकता राजगोर, सचिव डॉ. धरती माळी व डॉ. प्राजक्ता पाटील यांच्यासह विविध सदस्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमास वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन MHFDA पालघर टीमच्या वतीने करण्यात आले आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button