डॉ. सुहास माने यांची पालघर जिल्ह्यास भेट
पालघर : सिकलसेल आजाराचे प्रमाण कमी करून सिकलसेलमुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘अरुणोदय सिकलसेल विशेष तपासणी मोहिमे’च्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (वैद्यकीय) तथा विभागीय नोडल अधिकारी, अरुणोदय सिकलसेल विशेष अभियान अधिकारी डॉ. सुहास माने यांनी दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी पालघर जिल्ह्यास भेट दिली.
यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुर्झे अंतर्गत भोईरपाडा (पोस्ट कुर्झे, ता. विक्रमगड) येथील सिकलसेल ग्रस्त रुग्णांना प्रत्यक्ष गृहभेट देऊन त्यांच्या आरोग्याची पाहणी केली. रुग्णांना सिकलसेल आजाराबाबत आवश्यक काळजी, नियमित औषधोपचार घेण्याचे महत्त्व याविषयी समुपदेशन करण्यात आले. तसेच सिकलसेल रुग्णांना देण्यात आलेल्या ओळखपत्र (कार्ड) वितरणाची पाहणी करण्यात आली. कोणतीही अडचण भासल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र, कुर्झे येथे तपासणीसाठी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी रुग्णांच्या समस्या व अडचणींबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.
सिकलसेल आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत अरुणोदय विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ० ते ४० वर्षे वयोगटातील उर्वरित सर्व व्यक्तींची Solubility व HPLC तपासणी करून घेण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
तसेच सिकलसेल रुग्ण व वाहक यांना प्रत्यक्ष गृहभेटी देऊन त्यांना नियमित औषधोपचार मिळत आहेत का याची खात्री करावी, रुग्ण व वाहकांचे योग्य समुपदेशन करावे आणि दोन रंगीत कार्डधारक व्यक्तींनी परस्पर विवाह करू नये याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले. या मोहिमेच्या माध्यमातून सिकलसेल आजाराबाबत जास्तीत जास्त जनजागृती करण्यावर भर देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
या आढावा बैठकीस मा. डॉ. वैदही माळवी (DRCHO), विनोद रडे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. महेश जाधव (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कुर्झे), इंदल जाधव (जिल्हा सिकलसेल समन्वयक) तसेच इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
